मला नवी सुरुवात करायची आहे म्हणत…,तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

छत्रपती संभाजीनगर : शहरातील पोलिस उपायुक्त यांच्या मुलाने केलेल्या आत्महत्येचा बातमीमुळे शहरात एकाच खळबळ उडाली आहे. पोलिस उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांच्या एकुलत्या एक मुलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साहिल शीलवंत नांदेडकर (वय १७) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. १२ ऑक्टोबरला नांदेडकर कुटुंबीयांनी एकत्र दसरा साजरा केला. साहिलने आदल्या दिवशी वडिलांशी संवाद साधला. मात्र, दुसऱ्या दिवशी त्याने गळफास घेतला. नांदेडकर हे सकाळी ६ वाजता वॉकिंगला जाण्यासाठी उठले. तेव्हा साहिल झोपेतून उठला नसल्याचे त्यांनी पाहिले. त्यामुळे त्यांनी साहिलला उठवण्यासाठी त्याला आवाज दिला. मात्र, त्याच्या खोलीतून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पोलिस उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांनी साहिलच्या खोलीचा दरवाजा जोरदार वाजवला. त्यांनी साहिलच्या बाजूच्या खिडकीतून पाहिले असता त्याने गळफास घेतल्या आढळले.

दरम्यान त्याने त्याच्या खोलीतील आरशात, मी जीवनाचा आनंद घेतला आहे, मी माघार घेत नसून मला नवी सुरुवात करायची आहे, लव्ह यू बोथ असे लिहून ठेवले आहे. या प्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता.