चोपडा : शहरातील ३५ वर्षीय तरुणाने राहत्या घरी छताच्या पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेत जीवनयात्रा संपवल्याची घटना गुरुवार,२५ रोजी उघडकीस आली.याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुनील दिलीप बडगुजर असे मयत तरुणाचे नाव आहे.
सुनील बडगुजर हा तरुण प्लम्बिंगचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत होता. शुक्रवार, २५ रोजी सुनील घरी एकटाच होता. त्याच्या घरातील भाडेकरू यांनी सुनील अजून बाहेर का आला नाही, म्हणून सुनीलच्या घराचा दरवाजा ठोठावला. परंतु, त्यांनी दरवाजा उघडलाच नाही. त्यामुळे त्यांनी लागलीच फोन वरून सुनीलचे मोठे बंधू अनिल बडगुजर यांना ही माहिती दिली. त्यानंतर अनिल यांनी घराचा दरवाजा उघडला असता सुनीलने छताच्या पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचे सकाळी १० वाजेच्या सुमारास उघड झाले. यानंतर नातेवाईकांनी त्यांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉ. स्वप्ना पाटील यांनी तपासून मृत घोषित केले.डॉ. स्वप्ना पाटील यांच्या खबरीवरून चोपडा शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुनीलने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, हे मात्र समजू शकले नाही.