यावल : तालुक्यातील किनगाव नीलिमा संजय कोळी (२८) या विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी रुपेश राजेंद्र धनगर (किनगाव बुद्रुक) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपी रुपेशने गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने नीलिमाकडे वाईट भावनेने पाहून तू माझ्याशी प्रेमसंबंध ठेव, असा तगादा लावला होता. वारंवार माझ्याशी प्रेमसंबंध ठेव नाहीतर मी तुझ्या नवऱ्याला आणि मुलांना मारून टाकेल, अशी धमकी देखील तो देत होता. या तरुणाच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने शनिवारी आपल्या राहत्या घरात स्वयंपाक खोलीत गळफास घेत आपली जीवन यात्रा संपवली.
याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात रविवारी मयत विवाहितेचे पती संजय भागवत कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विवाहितेला आत्महत्या प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलीस निरीक्षक विनोदकुमार गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे.