चोपडा तालुक्यात भाजप पदाधिकाऱ्यांची आत्महत्या ; तालुक्यात खळबळ

चोपडा :  तालुक्यातील घुमावल येथील भारतीय जनता पार्टीचे पंचायतराज ग्रामविकास विभागाचे संयोजक जळगाव पूर्व व माजी सरपंच प्रकाश पाटील उर्फ पप्पू दादा यांनी आज शनिवार, २० रोजी गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. त्यांच्या आत्महत्येने तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
प्रकाश पाटील यांनी आज शेताच्या बांधावर जाऊन झाडास फाशी घेऊन आपले जीवन संपविलं. त्यांच्या अशा जाण्याने तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले.  या आत्महत्यामुळे मनमिळाऊ स्वभावाचे पक्षासाठी धडपडणारा पदाधिकारी व सेवाभावी नेतृत्व असलेला पप्पूदादा गेल्याने तालुक्यातील भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.  आत्महत्याचे कारण अजूनही कळु शकले नाही. आत्महत्येची वार्ता कानोकानी पसरल्यानंतर हजारो समाजबांधव,सर्वपक्षीय कार्यकर्ते,पदाधिकारी यांनी उपजिल्हा रूग्णालयात एकच गर्दी केली होती. या धक्कादायक घटनेने समाजजीवन ढवळून निघाले आहे. सातत्याने समाजात सर्वच घटकांना न्याय मिळावा म्हणून धडपडणारा कार्यकर्ता असा अचानक कसा गेला याची हुरहुर व्यक्त होत होती.