‘उबाठा’ गटाला मोठा धक्का ! सुनील महाराजांचा पक्षाला रामराम, व्यक्त केली ‘ही’ खंत

#image_title

Mahant Sunil Maharaj : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. बंजारा समाजाच्या पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी शिवसेना ठाकरे गटाला रामराम केला आहे. अनेक महिन्यांपासून उद्धव ठाकरे यांनी भेटीसाठी वेळ दिला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

महंत सुनील महाराज यांनी ठाकरे गटाचा राजीनामा देताना आपली खंतही बोलून दाखवली. गेल्या १० महिन्यांत १० मिनिटेही उद्धव ठाकरेंचा वेळ मिळाला नाही. उद्धव ठाकरे वेळ देत नसल्यामुळे मी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याचं सुनील महाराज यांनी सांगितलं.

दरम्यान, वर्षभरापूर्वी ‘मातोश्री’वर जाऊन पोहरादेवी येथील महंत सुनील महाराज यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले होते. मात्र, आता सुनील महाराज यांनी आपल्याला प्रमुखांशी भेटण्याची वेळ मिळत नसेल तर माझी आपल्या पक्षाला काही गरज नाही, असं म्हणत आपली नाराजी व्यक्त केली.

सुनील महाराज काय म्हणाले?
“मी अनेकवेळा उद्धव ठाकरे यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला, मेसेजही केले. पक्ष वाढीसाठी आणि समाजाच्या हितासाठी मला तुम्हाला भेटायचे आहे. उद्धव ठाकरे यांचे पीए रवि म्हात्रे यांनाही अनेकवेळा संपर्क केला. त्यांच्याकडे उद्धव ठाकरे यांच्या भेटीची वेळ मागितली. मात्र, गेल्या जवळपास १० ते १२ महिन्यांपासून मला त्यांच्या भेटीचा साधा १० मिनिटेही वेळ मिळाला नाही. मग आपण भेटीची वेळ मागून जर भेट मिळत नसेल, आपली दखल घेतली जात नसेल पक्षाला आपली गरज नाही हे यामधून सिद्ध होतं”, असं सुनील महाराज यांनी म्हटलं आहे.