पोलीस अधीक्षकांची वकीलाला शिवीगाळ; साक्रीत कोर्टाचे कामकाज बंद

तरुण भारत लाईव्ह न्यूज । ८ डिसेंबर २०२२ । साक्री वकील संघाचे सदस्य ॲड.विशाल पिंपळे हे दि.७ डिसेंबर रोजी त्यांचे पक्षकारांसोबत कायदेशीर सल्लागार म्हणून पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस संरक्षण मागण्याकरीता अर्ज देणेसाठी गेले असता, पोलीस अधीक्षक संजय बारकुडं यांनी ॲड. पिंपळे यांना अश्लील शिवीगाळ करून हीन वागणूक दिली व खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप ॲड.पिपळे यांनी केला आहे.

या प्रकारचा साक्री वकील संघाच्या वतीने आज गुरुवारी कोर्टाचे कामकाज बंद ठेवून निषेध करण्यात आला. याबाबत तहसीलदार, साक्री यांना साक्री वकील संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले.

वकील संघाने काय म्हटलं?
साक्री वकील संघाचे सदस्य ॲड.विशाल पिंपळे हे दि.७ डिसेंबर रोजी त्यांचे पक्षकारांसोबत कायदेशीर सल्लागार म्हणून पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस संरक्षण मागण्याकरिता अर्ज देणेसाठी गेले असता, पोलीस अधिक्षक यांनी ॲड. पिंपळे यांना त्यांच्या दालनात बोलावून घेतले. ॲड. पिंपळे  यांनी त्यांचा संपुर्ण परीचय दिला तसेच मी कायदेशीर कामासाठी आलो आहे असे देखील सांगितले. मात्र, पोलीस अधिक्षक यांनी पक्षकारांसमोरच ॲड. विशाल पिंपळे यांचा पानउतारा केला. त्यांना अतिशय खालच्या भाषेत शिवीगाळ केली, पोलीस अधिक्षक यांनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग करुन ॲड. विशाल पिंपळे यांना खोटया गुन्हयात अडकविण्याच्या धमक्या दिल्यात.

साक्री वकील संघ सदर घटनेचा तिव्र शब्दात निषेध करतो. तसेच ॲड. विशाल पिंपळे हे त्यांच्या पक्षकाराच्या न्याय हक्कासाठी भांडत असताना एका उच्च पदस्थ व जबाबदार अधिकाऱ्यांने एका वकीलाला जी हिन दर्जाची वागणूक दिली त्याबाबत पोलीस अधिक्षकांवर तीव्र कारवाई व्हावी, असा आशय आहे.