Bhusawal : बसस्थानक, रेल्वे जागा अदला-बदलीसाठी सर्वेक्षण

भुसावळ : शहरातील बसस्थानकाची जागा रेल्वेला वर्ग करुन समोरील रेल्वेची जागा बसस्थानकाला देण्याची अर्थात जागांची अदलाबदल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. मंगळवारी एस.टी. महामंडळाचे जिल्हा वाहतूक नियंत्रक भगवान जगनोर व रेल्वेच्या स्थापत्य विभागाच्या अभियंत्यांनी संयुक्त सर्वेक्षण केले. या जागांच्या अदला-बदल करण्यासाठी आता दोन्ही विभागांकडून वरिष्ठांना प्रस्ताव दिला जाणार आहे. या प्रस्तावानंतर पुढील प्रक्रिया होईल. भुसावळातील रेल्वे प्रशासनासोबत झाली होती चर्चा शहरात रविवारी ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, आमदार संजय सावकारे व डीआरएम ईती पांडे यांच्यात बसस्थानक व समोरील जागेत अदला-बदल करण्याबाबत चर्चा झाली होती. सद्यस्थितीत असलेल्या बसस्थानकाच्या जागेत रेल्वेला विकासात्मक कामे करायची आहेत. समोरील रेल्वेची जागा सध्या धुळखात पडून आहे. दोन्ही जागा अदला बदल होऊ शकतात. अशा चर्चेनंतर मंगळवारी एस.टी. महामंडळाचे जिल्हा वाहतूक नियंत्रक भगवान जगनोर तसेच रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या दोन्ही जागांची मोजणी केली. बसस्थानका इतकीच जागा मिळाली तर ती किती होईल. यातून वापर कसा होऊ शकेल, याबाबत चर्चा झाली. दरम्यान, या सर्वेनंतर आता मुख्यालयाकडे प्रस्ताव देवू या प्रस्तावाला पुढील मंजुरीनंतर वेग येईल, अशी माहितीही जगनोर यांनी दिली.

तर आरक्षण हटवावे लागेल
बसस्थानकाच्या समोरील जागा रेल्वे लॅण्ड डेव्हलपमेंट ॲथॉरीटी अर्थात आरएलडीएची आहे. यातील पूर्वेकडील काही जागा बीओटीवर बांधकामासाठी देण्यात आली आहे तर पश्चिमेकडील उर्वरित जागेत पालिकेचे पार्किंगसाठीचे आरक्षण आहे. जागांची आदलाबदल करण्यासाठी नियमांनुसार मंत्रीमंडळ व राज्य शासनाची परवानगी घेवून आरक्षण हटवावे लागणार आहे.