---Advertisement---
गांजासदृश अंमली पदार्थ संशयित दुचाकीने गलंगी व्हाया चोपडा येथे आणत असल्याची गोपनीय माहिती एलसीबीला मिळाली. त्यानुसार पोलिसांचे पथक अलर्ट होते. गलंगी गावाजवळ पोलीस पाळत ठेऊन असल्याचे दिसताच संशयित सुसाट वेगाने चोपडाकडे खाना झाले. चोपडा येथे पोलिसांनी लावलेल्या नाकाबंदीत संशयिताना शिताफीने पकडले. संशयितांकडून एक लाख २१ हजार ९५० रुपये किमतीचा आठ किलो १३० ग्रॅम गांजा, दुचाकी, मोबाइल असा सुमारे ०२ लाख ६२ हजार ९५० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
दोन इसम काळ्या रंगाच्या बजाज पल्सर दुचाकीने गलंगी गावाकडून चोपडा शहराकडे अवैध गांजासदृश अंमली पदार्थाची बेकायदेशीररित्या वाहतूक करीत आहेत, अशी गोपनीय माहिती रविवारी (२० जुलै) रात्री ८.३० वाजेच्या सुमारास एलसीबीचे हवालदार रवींद्र पाटील यांना मिळाली. त्यानुसार हवालदार विष्णु बिन्हाडे, रवींद्र पाटील तसेच दीपक माळी यांनी गलंगी गावात संशयितावर पाळत ठेवली. पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, हवालदार विलेश सोनवणे यांनी संशयित येत असलेल्या चोपडा शहरात रस्त्यावर पाळत ठेवली.
पोलिसांनी केला पाठलाग
दरम्यान गलंगी गावात पोलिसांनी पाळत ठेवत्याचे लक्षात येताच संशयित चोपडा शहराकडे भरधाव वेगात पल्सरने निघाले. त्यांचा पाठलाग हवालदार विष्णु बिऱ्हाडे, रवी पाटील, दीपक माळी हे करीत होते. मात्र संशयितांचा वेग अधिक असल्याने या पोलीस पथकाने ही माहिती उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे यांना दिली. उपनिरीक्षक वल्टे यांच्यासह पथकाने नागरिकांच्या मदतीने चोपडा येथे नाकाबंदी लावली.
संशयितांना पकडण्याचा प्रयत्न केला असता दुचाकीवर मागे बसलेल्या एका संशयिताने उडी मारुन पळ काढला. त्याचा जवळपास १५० ते २०० मीटर अंतर धावत पोलिसांनी पाठलाग केला. उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे यांनी त्यास शिताफीने ताब्यात घेतले.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, चाळीसगाव भाग अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब घोलप यांच्या सुचनेनुसार एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, सपोनि एकनाथ भिसे यांनी ही कारवाई केली.
चोपडा पोलिसांकडे जमा
संशयितांकडून ९० हजाराची एक बजाज पल्सर (एमएच १८ बीडब्ल्यू ८०३५) तसेच १ लाख २१ हजार ९५० रुपये किमतीचा गांजा, ५१ हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल असा २ लाख ६२ हजार ९५० रुपये किमतीच्या मुद्देमालासह उदयभान संजय पाटील (वय २१) तसेच योगेश रामचंद्र महाजन (वय २१, दोन्ही रा. अडावद) या दोघांना ताब्यात घेतले. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.