Theft : ट्रीलरच्या चोरीत वापरलेल्या ट्रॅक्टरसह संशयित जेरबंद

जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील न्हावे शेतशिवारातून लोखंडी नांगरटीचे ट्रीलर चोरट्यांनी चोरून नेले होते. या गुन्ह्याच्या तपासात हे ट्रीलर नेण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर चोरट्याने केला होता. चोरून नेलेले ट्रीलर तसेच वाहनासह संशयिताला चाळीसगाव ग्रामीण पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले. समाधान उर्फ श्याम भीमराव पिलोरे (वय ३५, रा. न्हावे, ता. चाळीसगाव) असे संशयिताचे नाव आहे.

शरद भास्करराव पाटील (वय ३५, रा. ढोमणे, ता. चाळीसगाव) यांच्या मालकीचे सुमारे साठ हजार किमतीचे नागरंटीचे ट्रीलर खंडा भगा शिंदे (रा. न्हावे) यांच्या शेतात ठेवले होते. हे ट्रीलर चोरून नेल्याची घटना १५ मे रोजी सकाळी उघडकीस आली.

या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. संशयिताचे कोणतेही धागेदोरे हाती नसताना चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवित अवघ्या तीन दिवसात गोपनीय माहितीच्या आधारे संशयित समाधान उर्फ श्याम पिलोरे याला निष्पन्न केले. त्याने हे ट्रीलर चोरून नेण्यासाठी ट्रॅक्टरचा केला होता. पथकाने त्याच्याकडून चोरीस गेलेले ट्रीलर तसेच चोरीसाठी वापरलेले तीन लाखांचे ट्रॅक्टर असा मुद्देमाल हस्तगत केला.

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, चाळीसगाव परिमंडळचे अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, सहायक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव ग्रामीणचे सहा. पोलीस निरीक्षक प्रवीण दातारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण सपकाळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल जयेश पवार,पोलीस हेड कॉन्स्टेबल ओंकार सुतार यांनी ही कारवाई केली.