---Advertisement---
नंदुरबार : जबरीने पैसे हिसकावून पोबारा करणे आणि घरफोडीतील संशयितांसह हद्दपार असलेल्या व्यक्तीला शहर पोलिसांनी अटक केली. शहर पोलिसांकडून गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण वाढल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
नंदुरबार शहरात १२ जुलै रोजी घरफोडी झाली होती. घरफोडीतील संशयित हे कंजरवाडा परिसरात असल्याची माहिती मिळाल्यावर पथकाने त्या भागात शोध घेतला असता तेथे संशयित देवकृष्णा विशाल घमंडे व राज सुनील घासीकर हे मिळून आले. त्यांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई सुरू आहे.
याशिवाय नंदुरबारात मंगळ बाजार परिसरातील बालाजी केक शॉपजवळ एकाला मारहाण करून त्याच्याकडून रोख रक्कम लांबविण्यात आली होती. याप्रकरणी ५ जुलै रोजी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील संशयिताची माहिती मिळताच शहर पोलिसांच्या पथकाने विपुल रामचंद्र कासार, रा. गोकुळधाम सोसायटी, नंदुरबार यास ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
याशिवाय शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पावबा भिकन आखाडे, रा. सिंदगव्हाण, ता. नंदुरबार यास मे २०२४ पासून जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे. असे असतानाही कुठलीही परवानगी न घेता तो शहर बसस्थानक परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिस निरिक्षक हेमंतकुमार पाटील यांना मिळाली. त्यांनी लागलीच पथकाला पाठवून त्याचा बसस्थानक परिसरात शोध घेतला असता मिळून आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्यावर शहर पोलिसांत हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस., अपर अधीक्षक आशित कांबळे, डीवायएसपी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक हेमंतकुमार पाटील, उपनिरीक्षक विकास गुंजाळ, हवालदार दीपक बुनकर, पंकज महाले, प्रवीण वसावे, किरण मोरे, भगवान मुंडे यांनी केली.