जळगाव : शहरात ३१ डिसेंबरच्या रात्री जीवंत काडतूसांसह गावठी पिस्तुल बाळगणाऱ्या मामा-भाचा यांना पोलिसांनी अटक केली होती. ही घटना ताजी असताना चोपडा ग्रामीण पोलिसांनी देखील गावठी कट्टा व जिवंत काडतूस घेऊन जाणाऱ्या एकास अटक केली आहे. यामुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
चोपडा ग्रामीण पोलिसांनी बुधवार, 1 जानेवारी रोजी सायंकाळी गावठी बनावटीचा कट्टा आणि दोन जिवंत काडतूस घेऊन दुचाकीने जाणाऱ्या संशयित आरोपीला अटक केली. चोपडा तालुक्यातील लासुर ते सत्रासेन रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली.
अटक केलेल्या आरोपीचे नाव मनीष सुभाष जगताप (वय 32, रा. महादेव मंदिराजवळ क्रांती चौक, शिरपूर, जिल्हा धुळे) आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 1 लाख 27 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, ज्यामध्ये गावठी बनावटीचा कट्टा, दोन जिवंत काडतूस, दुचाकी (क्रमांक MH 04 EL 0308), मोबाईल फोन आणि रोख रक्कम यांचा समावेश आहे.
पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्यासह पथकातील राकेश पाटील, रावसाहेब एकनाथ पाटील, चेतन महाजन, गजानन पाटील, विनोद पवार यांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर आणि विनोद पवार हे करत आहेत.