पाचोरा : अल्पवयीन मुलीस काहीतरी फूस व आमिष दाखवून अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या वेळी पळवून नेल्या प्रकरणी पुनगाव येथील संशयित आरोपी तरुणास अटक करण्यात आली असून रविवारी संशयिताची दिवसभर चौकशी करण्यात आली.
या घटने बाबत सविस्तर वृत्त असे की, शुक्रवार ५ जुलै रात्री ९ ते शनिवार ६ जुलै रोजी रात्री २.३० वाजेचे सुमारास पाचोरा तालुक्यातील पुनगाव येथील अल्पवयीन मुलीस अज्ञात व्यक्तीने फुस व आमीष दाखवून पळवून नेल्याची घटना घडली असुन मुलीच्या आईने दिलेल्या फिर्याद वरून पाचोरा पोलिसात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास हा पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल नरेंद्र नरवाडे हे करीत आहेत.
संशयित आरोपी तरुणास अटक
अल्पवयीन मुलीस पळवून नेणारा संशयित आरोपी नाशिक येथे असल्याची माहिती पोलीस हेड कॉन्स्टेबल नरेंद्र नरवाडे यांना मिळाली. त्यांनी पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली क्षणाचा विलंब न करता पाचोरा येथून पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक हटकर व महिला पोलीस प्रियंका अहिरे यांना नाशिक रवाना केले व संबंधित पोलीस स्टेशन येथून संशयित आरोपीसह मुलीस ताब्यात घेऊन पाचोरा पोलीस स्टेशन येथे आणून अटक करण्यात आली. संशयित आरोपी तरुणाचे नाव करण शाम परदेशी (वय-२०) (रा.पुनगाव) असे असून रविवारी या तरुणाची दिवसभर चौकशी करण्यात आली.