Suspended Inspector : जळगावचे निलंबित निरीक्षक बकाले प्रत्यक्ष न्यायालयात नाहीच; आभासीरित्या पोलिसांनी केले हजर

Suspended Inspector : जळगाव एलसीबीचे वादग्रस्त पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांची दोन दिवसांची पोलीस कोठडी संपली. बुधवारी त्यांना न्यायालयासमोर पोलीस हजर करतील, असे गृहीत धरले जात होते. परंतु ताब्यातील बकाले यांना प्रत्यक्ष न्यायालयात हजर करण्यात पोलीस नरमले. बकालेंना आभासी पध्दतीने (व्हीसीव्दारे) न्यायालययात हजर करण्यात आले. तपासाधिकाऱ्यांच्या विनंतीनुसार, त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. बकालेंच्यावतीने जामीनसाठी सादर केलेल्या अर्जावर न्यायालयाने तपासाधिकारी तसेच सरकारी अभियोक्त्यांचा गुरुवारी खुलासा मागविला.

विविध संघटनेचे पदाधिकारी न्यायालयात

आज (17 रोजी) पोलीस कोठडी संपल्याने निलंबित पोलीस निरीक्षक बकाले यांना पोलीस आज हजर करतील, असे गृहीत धरत अ.भा.मराठा युवक, छत्रपती शिवाजी ब्रिगेड, छावा संघटना, बुलंद छावा, जिजाऊ ब्रिगेड मराठा सेवा संघाचे असंख्य कार्यकर्ते न्यायालयात उपस्थित होते. राम पवार, रवी देशमुख, वाल्मिक पाटील, अशोक शिंदे, संतोष पाटील, भीमराव मराठे,प्रमोद पाटील, धवल पाटील, मनोज मोहिते यांच्यासह महिला तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.

हरकतदार महिलांच्यावतीने खुलाशासाठी दिला अर्ज

जामीन अर्ज सादर झाल्याने न्यायालयाने तपासाधिकारी तसेच सरकारी अभियोक्ता यांना खुलासा सादर करण्याचे आदेश दिले. हरकतदार पीडित महिलांतर्फे ॲड. गोपाळ जळमकर यांनी खुलासा सादर करण्यासाठी अर्ज न्यायालयात सादर केला. हा अर्ज न्यायालयाने मंजूर केला. यामुळे गुरुवार, 18 रोजी न्यायालयात खुलासा सादर करण्याचे कामकाज होईल. त्यानंतर जामीन अर्जावर युक्तीवादाच्या कामकाजाला सुरुवात होईल.

पोलिसांविरुध्द तक्रार विचारताच बकाले म्हणाले, नाही!
व्हीसीव्दारे तपासाधिकारी तथा उपअधीक्षक संदीप गावीत यांनी तत्कालीन पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मुख्य न्यायदंडाधिकारी न्या. विनय व्ही. मुगळीकर यांच्या न्यायालयात सकाळी 11.24 वाजता हजर केले. कामकाजाच्या सुरूवातीपूर्वीच पोलिसांविरुध्द काही तक्रार, असे न्यायालयाने विचारणा केली असता नाही, असे ते म्हणाले. तुम्हाला न्यायालयीन कोठडीत घेतले, असे न्यायालयाने बकाले यांना सांगितले. त्यापाठोपाठ बकाले यांच्यावतीने त्यांच्या वकिलाने जामिनासाठी अर्ज न्यायालयात सादर केला.

बकालेंच्या आवाजाचा नमुना पाठविला तपासणीला

निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मोबाइलवर बोलताना विशिष्ट मराठा समाजाबद्दल तसेच मराठा समाजाचे पोलीस अधिकारी यांच्याबाबत अतिशय घृणास्पद व आक्षेपार्ह वकतव्य केले. हे संभाषण समाज माध्यमांमध्ये प्रसारीत होऊन ते हरकतदार पीडित महिलेंच्या व्हाटसॲप ग्रृपवरही प्रसारीत झाले. समाजात व्देषाच्या व दुष्टत्वाच्या भावना वाढविण्याचा प्रयत्न केला. संशयिताने अश्लिल शब्दप्रयोग करुन कोणत्याही जात धर्माचे स्त्रियांचे मनास लज्जा उत्पन्न होईल,असा उच्चार व शब्दप्रयोग केला.या कारणावरुन गुन्हा दाखल झाला, अशी नमूद फिर्याद आज तपासाधिकाऱ्यांनी न्यायालयात हजर केली. संशयिताचा घेण्यात आलेला आवाजाचा नमुना संचालक वैज्ञानिक प्रयोगशाळा नाशिक येथे पडताळणीसाठी पाठविला आहे. गुन्ह्याचा तपास करणे अद्याप बाकी आहे. यासाठी संशयिताला न्यायालयीन कोठडी मिळावी, अशी विनंती तपासाधिकाऱ्यांनी न्यायालयाला केली.