क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांचं २ ते ३ दिवसांत निलंबन! या काँग्रेस नेत्याने दिली माहिती

मुंबई : विधानपरिषद निवडणूकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या ७ आमदारांचं २ ते ३ दिवसांत निलंबन करण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेस नेते अभिजीत वंजारी यांनी मंगळवारी वृत्तवाहिनीशी बोलतांना दिली.

अभिजीत वंजारी म्हणाले की, “ज्यांनी पक्षाच्या आदेशाचं उल्लंघन केलं त्यांच्यावर सहा वर्षांसाठी निलंबन करणे, ही एकच कारवाई आहे. चंद्रकांत हंडोरेंबाबत जे घडलं ते पुन्हा घडू नये, यासाठी सर्व नेत्यांनी ही स्ट्रॅटेजी आखली होती. यासाठी त्यांनी परफेक्ट प्लान तयार केला होता. या ट्रॅपमध्ये पक्षाशी बेईमानी करणारे लोक सापडले आहेत.”

ते पुढे म्हणाले की, “प्रज्ञा सातव यांच्याकरिता आम्ही ३० मतं निश्चित केली होती. त्यापैकी त्यांना २५ मतं मिळाली असून ५ मतं फुटली आहेत. तसेच मिलींद नार्वेकरांसाठी असलेल्या ७ मतांपैकी २ मतं फुटली आहेत. अशी एकूण ७ मतं फुटली आहेत. त्यामुळे याबाबत पक्षश्रेष्ठी सिरियस असून येत्या २-४ दिवसांमध्ये या आमदारांचं निलंबन होईल,” अशी माहिती त्यांनी दिली.