मुंबई : छोट्या पक्षांना अजगरासारखं गिळून टाकणं ही उबाठा गटाची कार्यपद्धती असून पुढचा नंबर शरद पवार गटाचा आहे, असं वक्तव्य मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केले आहे. विधानपरिषद निवडणूकीच्या निकालानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
आशिष शेलार म्हणाले की, “महाराष्ट्राच्या राजकारणात आम्ही सोडून अन्य कुठल्याही पक्षाला स्थान मिळू नये, अशी उबाठा गट आणि उद्धव ठाकरेंची कार्यपद्धती राहिली आहे. एकीकडे हुकुमशाहीच्या विरोधात आहे म्हणून सांगतात आणि त्यापेक्षा विपरित त्यांची कार्यपद्धती दिसते. महाराष्ट्रात स्वकष्टाने उभ्या केलेल्या पक्षाला अजगरासारखं गिळून टाकायचं ही उबाठाची कार्यपद्धती आहे.”
“त्यामुळे त्यांनी लोकसभेत राजू शेट्टींच्या पक्षाला मदत न करता त्यांना नेस्तनाबूत करण्याचं काम केलं. मुंबई शिक्षक मतदार संघात महाआघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिक्षक भारतीचे नेते कपिल पाटील यांच्या उमेदवाराचा उबाठाने पराभव केला. गम्मत म्हणजे कपिल पाटीलांच्या समाजवादी गणराज्य पक्षाची स्थापनाच उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाली होती. कपील पाटील यांच्या पक्षालाही संपवण्याचं काम त्यांनी केलं. आता शेकापचे जयंत पाटील यांना पाडण्यामागेसुद्धा उद्धवजींच्या पक्षाचाच हात आहे. आपलं कुणी ऐकत नसेल तर त्याला संपवा, अशी त्यांची वर्तवणूक आहे. राजू शेट्टी, कपील पाटील आणि जयंत पाटील यांच्यानंतर आता पुढचा नंबर शरद पवार गटाचा असेल. त्यांच्याशी वितुष्टासारखं वागण्याचं काम उद्धवजी आणि त्यांचा पक्ष करेल,” असं भाकित आशिष शेलारांनी यावेळी केलं.