अनादि मी, अनंत मी’ या ‘आत्मबल’ असे शीर्षक असलेल्या गीताला महाराष्ट्र शासनाचा ‘छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार दिल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन!
महाराष्ट्र ही संतांची आणि महापुरुषांची भूमी आहे. एखाद्या देशालाही महापुरुषांची इतकी परंपरा लाभत नाही ती आपल्या महाराष्ट्राला लाभली आहे. पण आपले दुर्दैव असे की, आपल्याला ती परंपरा जपता आली नाही. असं म्हणतात की, दक्षिण भारतात प्रांतवादाचं राजकारण खूप मोठं आहे. उत्तर भारतात जातीचं राजकारण मोठं आहे. पण आपल्या राज्यात आपण दुसरं काय केलं. आपण सर्वांनी मिळून सर्व महापुरुषांना जातीत विभागून टाकलं. ‘दूषित छद्म पुरोगामी चळवळ’ महाराष्ट्रात इतकी जोर धरली की, आपल्या भूमीला महापुरुषांचं वरदान मिळालं होतं; ते आपल्याला घेता आलं नाहीच. उलट आपण त्या वरदानाचं शापात रूपांतर केलं. इतके आपण करंटे आहोत.
लक्ष्मण उतेकर या कष्टकरी मराठी माणसाने बॉलिवूडमध्ये नाव कमावलं व ‘छावा’ हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम भारतासमोरच नव्हे तर जगासमोर आला. आपले थोरले आणि धाकले असे दोन्ही छत्रपती म्हणजे आपला अभिमान, स्वाभिमान, प्राण सगळंच आहेत. आपल्या छत्रपतींचा खरा इतिहास जर आपण जगाला ओरडून सांगितला तर जगातले सगळे योद्धे फिके पडतील. १०० आरडून नेपोलियन जरी समोर आले तरी आपले थोरले नि धाकले धनी त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ ठरतील, इतके आपले छत्रपती महान आहेत. पण आपण काय केलं? आपल्याला त्यांची महानता पचवता आली नाही. आपल्यासमोर साक्षात शिव शंभू उभे असताना आपण आपला स्वार्थ पाहिला आणि आजही आपण आपला स्वार्थ पाहत आहोत. छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर ज्यांनी आपली अस्मिता बाटवली, ज्या वाळवंटी विकृतीने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली, ज्याचे गोडवे आजही भारतात गायले जातात त्यांच्याविरुद्ध पेटून उठण्याऐवजी आपण आपापसातच भांडत आहोत. फितुरी कुणी केली यापेक्षा कोणासाठी फितुरी झाली हे जास्त महत्त्वाचं आहे. त्या मूळ शत्रूचे, त्या औरंग्याचे वैचारिक वारस आजही आपल्यात फूट पाडत आहेत आणि हे बेटे सोफ्यावर बसून अंगूर चघळत आहेत. इतिहास अभ्यासक विश्वास पाटील म्हणतात, “माणसाच्या स्वाथनिच सर्वांना पागल बनवलं होतं आणि त्यामुळे ही शोकांतिका शंभू राजेंच्या वाट्याला आली. शिवरायांनी एक महापुत्र या भूमीला दिला होता. पण तो तेजस्वी महापुत्र सांभाळण्याइतकी पात्रता या भूमीमध्ये नव्हती, असंच आपल्याला दुर्दैवाने मान्य करावं लागेल.” हे वाक्य विश्वास पाटील यांनी २२ फेब्रुवारी २०२५ रोजी त्यांच्या युट्यूब चॅनलवर ‘संभाजीराजांच्या घातपाताचे दुष्ट चक्र’ या व्हिडीओत उच्चारले आहे. मराठी माणूस शिव-शंभूचं तेज धारण करायला कमी पडला, हे सत्य नाकारता येत नाही वाचकहो…
आपल्या राज्यात जातिवाद निर्माण करण्यात एका विशिष्ट विचारधारेचा हात आहे. पुरोगामी या शब्दामुळे आपली वाताहत झाली आहे. पुरोगामित्व हे सर्व रोगांवरील औषध असेल असं भासवून आपल्याला ‘स्लो पॉयजन’ देण्यात आलं आणि हे स्लो पॉयजन आपल्या रक्तात इतलं भिनलंय की, जातिवादाशिवाय आपल्याला दुसरं काहीच दिसत नाही. त्याहीपेक्षा मोठं दुर्दैव म्हणजे आपण आपला जातीयवादाचा कंड शमवण्यासाठी महापुरुषांच्या नावांचा वापर करतो. समर्थ रामदास या महापुरुषाकडे केवळ ते ब्राह्मण आहेत म्हणून डोळेझाक करतो. त्यांचं साहित्य उच्च दर्जाचं आहे. त्यांनी रचलेल्या आरत्या आपण घरोघरी म्हणत असतो. स्वराज्यामध्ये त्यांनी दिलेलं योगदानही लक्षणीय आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे अफलातून व्यक्तिमत्त्व आपण कधी जाणून घेण्याचा प्रयत्नच केला नाही. त्यांच्यावर कोणत्या आधारावर बेछूट आरोप केले जातात? सावरकरांचा काळ हा काही प्राचीन किंवा शिवकाळ नाही. तर तो आधुनिक काळ आहे. त्या काळाविषयीचे अनेक पुरावे, संदर्भसहज उपलब्ध आहेत. त्यामुळे त्या काळाविषयी संभ्रमता असण्याचा प्रश्न उद्भवत नाही. तरीसुद्धा मुद्दामून कोणतेही मुद्दे काढून सावरकरांवर टीका केली जाते. त्यांच्यावर गलिच्छ आरोप केले जातात. तेव्हा मला त्या आरोप करणाऱ्यांचीच कीव येते. कारण सावरकरांवर चुकीचे आरोप करून आपण आपलेच नुकसान करतोय. सावरकर तर ‘धन्योहं धन्योहं’ म्हणत पुढच्या प्रवासाला निघून गेले. त्यांना काही फरक पडणार आहे का? पण सावरकर हे रत्न आहे. या रत्नाची पारख करण्याची आपली लायकी नाही. नुकसान आपले होते, आपल्या समाजाचे होते. छावा चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर सावरकरांनीच संभाजी महाराजांची बदनामी केली, अशी टीका काही महामूर्ख लोकांनी केली आहे. त्यावर सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी पुरावे सादर करून समर्पक उत्तरही दिलं आहे. लक्षात ठेवा, आरोप करणाऱ्यांनाही बऱ्याचदा सत्य परिस्थिती माहिती असते. पण जातीयवाद हा त्यांचा धंदा आहे आणि तो कितीही गंदा असला, तरी तो धंदा आहे. मात्र, स्वातंत्र्यवीर सावरकर हे छत्रपतींचे निष्ठावान भक्त होते, कृतिशील भक्त होते. त्यांच्या मनात छत्रपतींविषयी असलेली भावना त्यांनी अनेकदा व्यक्त केली आहे.
हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्तितम-तेजा
हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा
हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतीच्या साजा
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा
किंवा
जयदेव जयदेव जय जय शिवराया !
या या अनन्य शरणा आर्या ताराया !! धृ!!
आर्यांच्या देशावरि म्लेंच्छांचा घाला
आला आला सावध हो शिवभूपाला
सद्गदिता भूमाता दे तुज हाकेला
करुणारव भेदुनि तव हृदय न का गेला..
सावरकर रचित ही दोन्ही गीते शिवजयंतीला लावली जातात. या गीतांमध्ये सावरकरांची शिवभक्ती सहज दिसून येते. यासाठी वेगळ्या पुराव्यांची आवश्यकता नाही. आता तर मी आरोपांचं खंडण करणं वगैरे सोडूनच दिलं आहे. कारण आरोप करणाऱ्यांना पुरावे किंवा उत्तरे नको असतात. तर त्यांनी मांडलेलं असत्य हे सत्य असल्याचं सिद्ध करायचं असतं. माझे मित्र मला कधी कधी विचारतात की, “सावरकरांनी इतक्या चुकीच्या गोष्टी केल्या तर आम्ही त्यांना देशभक्त का मानायचं?” हे सगळे व्हॉट्स अॅप युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी आहेत. या व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटीमध्ये पुरावे सादर करण्याची पद्धत नसते. “आलं फॉरवर्ड की केलं फॉरवर्ड” हाच यांचा अभ्यासक्रम. पण सावरकरांचं साहित्य, चरित्र वाचण्याचे कष्ट आपण घेतले तर आपल्या लक्षात येईल की, छत्रपतींना आदर्श मानून सावरकर कार्य करीत होते. मुघल या परकीय शक्तीप्रमाणे सावरकरांच्या काळात इंग्रज होते. सावरकरांना इंग्रजांना पळवून लावून स्वराज्य स्थापन करायचं होतं. त्यासाठी सर्व जातींना एकत्र आणण्यासाठी त्यांनी हिंदुत्वाची चळवळ राबविली. पूर्वास्पृश्योद्धाराची चळवळ राबविली. हिंदू एकत्र आले तर इंग्रज काय जगातली कोणतीही शक्ती हिंदुस्थानाकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत करणार नाही, असा विश्वास सावरकरांना होता आणि हा विश्वास त्यांना छत्रपतींच्या भक्तीतून मिळाला. माउलींपासून छत्रपती शिवराय आणि छत्रपती शंभू राजे ते सावरकर यांच्यापर्यंत महाराष्ट्राला अनेक महापुरुष लाभले.