जळगाव : ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हे काळाच्याही पुढे होते. ते केवळ क्रांतिकारक, देशभक्त नव्हे तर लेखक, कवी, साहित्यिक, संघटक असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते, असे मत व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी व्यक्त केले.स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त बहुभाषिक ब्राह्मण संघ जळगाव व सावरकरप्रेमी विविध सहयोगी संघटनांच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार सुरेश भोळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. सुशील अत्रे, नंदकुमार जाधव, केशवस्मृती सेवासंस्था समूहाचे प्रमुख डॉ. भरतदादा अमळकर, बहुभाषिक ब्राह्मण संघाचे अध्यक्ष आर्की. नितीन पारगावकर, बहुभाषिक ब्राह्मण महिला संघाच्या अध्यक्ष्ाा वृंदा भालेराव उपस्थित होते. स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर जयंतीनिमित्ताने आयोजित व्याख्यानाला जळगावकरांनी उदंड प्रतिसाद दिला. प्रास्ताविक नितीन पारगावकर यांनी केले. सूत्रसंचालन ॲड. मुजुमदार यांनी केले. राजेश नाईक यांनी आभार मानले.
डिलीट मिळाल्याबद्दल डॉ. भरतदादा अमळकर यांचा झाला सत्कार
केशवस्मृती सेवा संस्था समूहाचे प्रमुख डॉ. भरतदादा अमळकर यांना डी.वाय.पाटील विद्यापीठातर्फे डिलीट मिळाल्याबद्दल सपत्नीक सत्कार करण्यात आला. यासोबतच सावरकरप्रेमी विविध पदाधिकाऱ्यांचादेखील यावेळी सत्कार करण्यात आला.
डॉ. सच्चिदानंद शेवडे पुढे म्हणाले की, ‘सावरकरांसारख्या अनेक थोर क्रांतिकारकांनी स्वराज्याची निर्मिती करण्यासाठी आपले आयुष्य झिजवले. आता त्यातून सुराज्याची निर्मिती कशी होईल हे आज आपल्या पुढचे ध्येय असले पाहिजे. ‘मित्रमेळा’ आणि ‘अभिनव भारता’च्या माध्यमातून युवकांचे संघटन करण्याची मोहीम सावरकरांनी सुरू केली होती. जेव्हा त्यांनी विदेशी कापडाची होळी केली तेव्हा देशातील त्या महात्म्याने सावरकरांच्या या कृत्याचा निषेध करणारे पत्र लिहिले होते. सावरकरांनी देशासाठी अनंत यातना भोगल्या. मात्र, त्या त्याग आणि यातनांची चर्चा होण्यापेक्षा इतर गोष्टींचीच अधिक चर्चा केली जाते. सावरकरांनी समुद्रात मारलेल्या ऐतिहासिक उडीचेदेखील विकृत राजकारण केले जाते. मात्र त्यातील खरा अर्थ समजून घेतला जात नाही. जगात ‘सनसनाटी’ निर्माण करण्यासाठी आणि जगाचे लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांनी हे कृत्य केले होते,’ असे शेवडे यावेळी म्हणाले. सावरकरांच्या बाबतीत होणाऱ्या आरोपांवर बोलताना डॉ. शेवडे म्हणाले की, ‘तब्बल 11 वर्षे सावरकरांनी अंदमान-निकोबारच्या कोठडीत काळ्या पाण्याची शिक्षा भोगली होती. मात्र त्यांच्या शिक्षेची चर्चा होण्यापेक्षा दुर्दैवाने त्यांच्या त्या कथित माफीपत्राचीच अधिक चर्चा केली जाते. 1942च्या आंदोलनाबाबत सावरकरांनी घेतलेल्या भूमिकेवरूनही अनेक वाद-प्रतिवाद केले गेले. चीनच्या बाबतीत सावरकरांनी सांगितलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने 1962 च्या युद्धात भारताचा पराभव झाला होता. पडत्या राष्ट्राला सावरणारा कर म्हणजे ‘सावरकर’ असे सावरकरांना कुणीतरी म्हटले होते, हे त्यांच्याकडे पाहून आपल्या लक्षात येते,’ असेही त्यांनी यानिमित्ताने अधोरेखित केले.
यावेळी ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. सुशील अत्रे यांनी अध्यक्षीय भाषणात ‘सावरकर एक झंझावात’ कसे होते यावर प्रकाशझोत टाकला. परंतु कवीमनाच्या व देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो, एवढा मोठा विचार करणारे सावरकर हे झंझावात कसे काय असू शकतात, हे विविध विषयांनी उदाहरण देत विषद केले.
सत्काराला उत्तर देताना डॉ. भरतदादा अमळकर यांनी सावरकरांच्या पंचसूत्रीचा त्यांच्या जीवनावर कसा प्रभाव राहिला हे सांगितले.