मुंबई हल्ल्याचा दहशतवादी तहव्वूर राणाला लवकरच भारतात आणण्यात येणार आहे. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या राणाच्या प्रत्यार्पणाला अमेरिकेने ग्रीन सिग्नल दिला आहे. ऑगस्ट 2024 मध्ये अमेरिकेच्या न्यायालयाने राणाला भारत-अमेरिका प्रत्यार्पण करारानुसार भारतात पाठवण्याचे आदेश दिले होते.
अमेरिकन कोर्टाच्या निर्णयानंतर राणाला भारताच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया वेगवान झाली आहे. राणावर डेव्हिड हेडलीला मदत केल्याचा गंभीर आरोप आहे. तहव्वूर राणाने या हल्ल्याचा मास्टरमाईंड डेव्हिड कोलमन हेडलीला मुंबईतील लक्ष्य शोधण्यात मदत केली होती. 26/11 च्या हल्ल्यातील लक्ष्य शोधण्याचे भक्कम पुरावे भारताने अमेरिकेच्या न्यायालयात सादर केले होते, ज्यामध्ये राणाचा सहभाग स्पष्टपणे दिसत होता. या प्रकरणात Non Bis Idem चा अपवाद लागू होणार नाही. अमेरिकेच्या न्यायालयाने मान्य केले की, भारतातील राणाविरुद्धचे आरोप वेगळे आहेत, त्यामुळे हा नियम लागू होणार नाही.
त्याचवेळी अमेरिकन कोर्टाने राणाची याचिका फेटाळून लावली. राणाने प्रत्यार्पण थांबवण्यासाठी हेबियस कॉर्पस दाखल केला होता, जो अमेरिकन कोर्टाने फेटाळला होता. त्याला शिकागो येथून 2009 मध्ये अटक करण्यात आली होती. एफबीआयने पाकिस्तान समर्थित नेटवर्कचा भाग असल्याच्या आरोपाखाली हल्ल्याच्या एका वर्षानंतर त्याला पकडले. तहव्वूर राणा यांच्यावर आयएसआय आणि लष्कर-ए-तैयबाशी संबंध असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. राणा याचे वर्णन पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा कार्यकर्ता म्हणून करण्यात आले आहे.