2023 मध्ये तैवानचा संघर्ष!

तरुण भारत लाईव्ह । रवींद्र दाणी । 2022 मध्ये राष्ट्रपती पुतिन नावाच्या हुकूमशहाने युक्रेनवर आणि जगावरही एक युद्ध लादले. आता 2023 मध्ये दुसरा एक हुकूमशहा, चीनचे राष्ट्रपती Taiwan struggle तैवानवर हल्ला करून जगावर आणखी एक युद्ध लादण्याची तयारी करीत आहे. वर्ष संपता संपता चीनने तैवानजवळ आजवरची सर्वात मोठी लष्करी कवायत केली. यात चीनची 71 लढाऊ विमाने सामील झाली होती. सोबत होता 7 युद्धनौकांचा ताफा! अमेरिकन सिनेटच्या सभापती नॅन्सी पॅलोसी यांनी तैवानला भेट दिल्यापासून चीन खवळला आहे. त्याने तैवानजवळच्या खाडीत लष्करी कवायती करणे सुरू केले आहे. त्या मालिकेतील ही सर्वात मोठी कवायत होती.

लक्ष हटविण्यासाठी
राष्ट्रपती शी जिनपिंग यांना तिसर्‍यांदा राष्ट्रपती व पक्षप्रमुख करण्यात आले असले तरी त्यांच्या नेतृत्वाविरुद्ध चीनमध्ये आवाज उठत आहे. याची कारणे वेगवेगळी आहेत. सरकार व संघटना यावर आपली पकड बळकट करण्यासाठी राष्ट्रपती शी जिनपिंग तैवानमध्ये लष्करी कारवाई करू शकतात, असे आता मानले जात आहे.

प्रथम हाँगकाँग
हाँगकाँग व Taiwan struggle तैवान या दोन भू-भागांना चीन आपले मानीत आला आहे. हाँगकाँगवर त्याने आपली पकड स्थापित केली आहे. हाँगकाँगमध्ये चिनी राजवटीविरुद्ध असंतोष असला तरी तो दडपण्यात चीनला यश आल्यासारखे दिसत आहे. चिनी सरकारविरुद्ध हाँगकाँगमध्ये जबर रोष आहे. मात्र, हा सारा रोष दडपून चीनने हाँगकाँगवर आपले वर्चस्व स्थापन केले आहे. आजवर हाँगकाँगची सत्ता स्थानिक लोकांकडे होती. चीनने तेथे आपला प्रशासक नेमून सारे अधिकार त्याला दिले आहेत. तैवानची स्थिती जरा वेगळी आहे.

युक्रेनची पुनरावृत्ती
युक्रेनमध्ये जे सुरू आहे, त्याची एकप्रकारे पुनरावृत्ती Taiwan struggle तैवानमध्ये होऊ शकते. 2014 मध्ये रशियाने युक्रेनचा किरमिया हा भाग ताब्यात घेतल्यापासून युक्रेनने आपली लष्करी सज्जता सुरू केली होती. आठ वर्षांपूर्वी युक्रेनचे लष्कर फक्त कागदावर अस्तित्वात होते. आठ वर्षांच्या तयारीनंतर युक्रेनच्या लष्कराने बलाढ्य मानल्या गेलेल्या रशियन लष्कराच्या नाकी नऊ आणले आहेत. आठ वर्षांच्या तयारीचा फायदा युक्रेनला आता होत आहे. हेच तैवानने सुरू केले. त्याने आपल्या देशात लष्करी प्रशिक्षण सक्तीचे केले आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी 4 महिन्यांवरून एका वर्षाचा केला आहे. म्हणजे चीन व तैवान दोन्ही देशांनी आपापल्या लष्करी तयारीचा प्रारंभ केला आहे.

अंदाज चुकला
तीन-चार दिवसांत युक्रेनचा पाडाव होईल असे मानले जात होते. अमेरिकेच्या सीआयए या गुप्तचर संघटनेचे असेच आकलन होते. पण, युद्धाचे चित्र बदलत गेले. अमेरिका व युरोपने युक्रेनला पाठिंबा देण्याचे धोरण राबविले. युक्रेनला आधुनिक शस्त्रास्त्रे दिली. त्याचा परिणाम दिसू लागला. अमेरिकेला अफगाणिस्तान व इराकमधील युद्ध जिंकण्यासाठी आपल्या काही सैनिकांच्या प्राणांची किंमत मोजावी लागली होती. युक्रेनमध्ये अमेरिकेला आपले उद्दिष्ट साध्य करता येत आहे, तेही आपल्या एकाही सैनिकाचे प्राण न गमावता. अमेरिकेला शीतयुद्धावर मोठी रक्कम खर्ची करावी लागत होतीच. याशिवाय अफगाणिस्तान-इराक या देशांमधून येणारे अमेरिकन सैनिकांचे पार्थिव देह अमेरिकन सरकारसाठी अडचणीचे ठरत होते. या सार्‍यापेक्षा ‘युक्रेन पॅटर्न’ अमेरिकेला सोईचा वाटू लागला आहे.

युक्रेन पॅटर्न?
अमेरिकेसाठी रशिया व चीन हे दोन्ही देश डोकेदुखी आहेत. रशियाला दाबण्यासाठी अमेरिका आता युक्रेनचा वापर करीत आहे. अमेरिकेने हजारो कोटी रुपयांचे आर्थिक साहाय्य व शस्त्रास्त्रे युक्रेनला दिली आहेत. राष्ट्रपती झेलेंस्की यांच्या ताज्या अमेरिकन दौर्‍यात याची घोषणा करण्यात आली. युक्रेनला एवढी आर्थिक मदत देण्याच्या मुद्यावर रिपब्लिकन व डेमोक्रॅट यांच्यात काही मतभेद आहेत. बहुधा यामुळेच झेलेंस्की यांनी अमेरिकन काँगे्रेसमध्ये केलेल्या आपल्या भाषणात दोन्ही पक्षांचा उल्लेख करीत, त्यांचे आभार मानले. अमेरिकेने आता आपले पॅट्रिएट प्रक्षेपणास्त्रही युक्रेनला देण्याचा निर्णय घेतला आहे. हवाई कवच म्हणून याचा वापर केला जातो. फक्त लांब पल्ल्याची प्रक्षेपणास्त्रे युक्रेनला दिलेली नाहीत. अमेरिका व रशिया यांचा थेट संघर्ष टाळण्यासाठी अमेरिकेने ही काळजी घेतलेली आहे. कारण, रशिया पूर्वीपासूनचे युक्रेनचे युद्ध अमेरिका लढत असल्याचे प्रतिपादन करीत आहे. एका अर्थाने हे प्रतिपादन योग्यही आहे. Taiwan struggle तैवानमध्ये अमेरिका हेच करण्याची चिन्हे आहेत. चीनला धडा शिकविण्यासाठी तैवानला जास्तीत जास्त सहकार्य करण्याचा विचार अमेरिकेने सुरू केला आहे. म्हणजे युक्रेन पॅटर्न तैवानला लागू करण्याची तयारी अमेरिकेने सुुरू केली आहे.

पेंटॉगानचा अहवाल
अमेरिकेच्या लष्कराचे मुख्यालय असलेल्या पेंटॉगानने एक अहवाल तयार केला असून, त्यात तैवान-चीन संघर्षाची चर्चा करण्यात आली आहे. चीनचा मुकाबला करण्यासाठी Taiwan struggle तैवानला येणार्‍या काळात कोणत्या लष्करी संसाधनांची मदत लागेल, त्यावर किती रक्कम खर्च करावी लागेल, तैवानने आणखी कोणकोणती तयारी केली पाहिजे याचे सविस्तर विवेचन या अहवालात करण्यात आले आहे.

युक्रेन धोरणात अमेरिकेला जे यश मिळत आहे, त्याचा विचार करून तैवान धोरण आखण्यात आले आहे. मात्र, एक महत्त्वाचा फरक म्हणजे शी जिनपिंग हे पुतिन नाहीत. पुतिन यांनी सारासार विचार न करता युक्रेनवर हल्ला चढविला. त्याचे परिणाम आता त्यांना भोगावे लागत आहेत. सारा युरोप व अमेरिका त्यांच्या विरोधात एकवटला आहे. जिनपिंग असा जुगार खेळणार नाहीत.

रणक्षेत्र बदलणार
युक्रेन युद्ध कुठवर जाणार याचा अंदाज बांधता आलेला नाही. राष्ट्रपती पुतिन कधी अण्वस्त्रे वापरण्याची भाषा बोलतात तर कधी चर्चेच्या माध्यमातून युद्ध संपविण्याची भाषा बोलतात. पुतिन यांच्या प्रकृतीविषयी वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. म्हणजे युक्रेन युद्धाने तयार केलेली अनिश्चितता कायम असताना, Taiwan struggle तैवान युद्धाची चर्चा नव्हे, तयारी सुरू झाली आहे. याचा अर्थ जागतिक संघर्षाचे फक्त रणक्षेत्र बदलणार आहे. हा संघर्ष फक्त चीन-तैवानपुरता मर्यादित असेल की त्याची व्याप्ती भयावह असेल असे प्रश्न आता विचारले जाऊ लागले आहेत. युक्रेन युद्धाच्या आर्थिक झळा जगाला आणि भारतालाही बसत आहेत. 2022 संपताना मंदीचे आगमन झाले असल्याचे दिसत आहे. कोरोनामुळे जगाची आर्थिक घडी विस्कटली. सारे जग त्यातून सावरण्याचा प्रयत्न करीत असताना, पुतिन यांनी युक्रेन युद्ध सर्वांवर लादले. हे युद्ध निकरावर आले असताना, तैवान युद्धाचे ढग जगावर गडद होत आहेत. या संघर्षाच्या बसणार्‍या झळा अधिक तीव्र असतील. कारण, हा संघर्षही मोठा असेल.