अमळनेर : शहरातील प्रसिद्ध रऊफ बँड पथकाच्या मालक असलम अली (वय 29, रा. सराफ बाजार, अमळनेर) याच्यावर चोपडा तालुक्यातील धानोरा येथील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीस फसवून तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे. चोपडा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, भारतीय जनता पार्टी अमळनेरच्या वतीने अमळनेर पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन रऊफ बँड पथकावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, सदर गुन्ह्यामध्ये रऊफ बँड पथकाच्या गाडीचा वापर झाल्याचे निदर्शनास आले आहे. ही गाडी जिल्हाभर वाहतूक व परिवहन विभागाच्या नियमांचे उल्लंघन करत फिरत असल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे ही गाडी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात जमा करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच गुन्ह्यात सहभागी असलेल्या असलम अली व त्याच्या सहकाऱ्यांचे मोबाईल ताब्यात घेऊन सीडीआर तपासणी करून सखोल चौकशी करावी व कठोर कारवाई करावी, जेणेकरून अशा प्रकारच्या गुन्हांना आळा बसेल, असेही भाजपच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणामुळे अमळनेर शहरात संतापाची भावना असून, भविष्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने तत्काळ पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या वेळी भाजपा जानवे मंडल अध्यक्ष जिजाबराव पाटील, मंडल अध्यक्ष राहुल पाटील, भाजपा शहराध्यक्ष योगेश महाजन, माजी नगरसेवक श्याम पाटील, माजी नगरसेवक विक्रांत पाटील, माजी नगरसेवक संजय पाटील, शिवसेना ( शिंदे गट ) तालुका प्रमुख सुरेश पाटील, युवा मोर्चा देवा लांडगे, समाधान पाटील, अक्षय चव्हाण, दर्पण वाघ, मनोज शिंगाणे, अनिरुद्ध शिसोदे, शुभम पवार, अक्षय पाटील, उज्वल मोरे, विठ्ठल पाटील, प्रेम पाटील, देव गोसावी, संतोष पाटील, सं जय पाटील यांच्यासह शेकडो नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.