जळगाव : बसमध्ये चढत असताना योगेश गर्दीचा फायदा घेत चोरट्याने दोन महिलांच्या पर्समध्ये ठेवलेले सुमारे सहा लाख तीस हजार किमतीचे सोन्याचे दागिने लांबविले. ही घटना रविवार, २१ रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास शहरातील अजिंठा चौफुली येथे ठाणे ते मुक्ताईनगर या बसमध्ये घडली. याप्रकरणी बुधवार, २४ रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. किरण योगेश बोरसे (वय ३४, रा.नारायणनगर, साई विहार, भुसावळ) येथे पती योगेश बोरसे, सासु निर्मलाबाई, मुलगा व मुलगी असे कुटुंब वास्तव्यास आहे. जळगाव येथे अयोध्यानगरात त्यांचे भासजवाई संजय लेणेकर हे राहतात. त्यांच्याकडे रविवार, २१ रोजी ओवाळीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी १२ वाजता किरण तसेच त्यांचे पती नणंद मनीषाबाई सहावे असे भुसावळ येथून अयोध्यानगर येथे आले. कार्यक्रम आटोपल्यानंतर दुपारी भुसावळ येथे जाण्याची बोरसे परिवाराने तयारी केली. किरण बोरसे यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने अंगावरील सोन्याचे दागिने काढुन पर्समधील पाकीटात ठेवले. त्यांची नणंद मनीषाबाई सहावे यांनीही त्यांच्या अंगावरील दागिने त्यांच्या पर्समध्ये ठेवले. त्यानंतर ते दुपारी ४ वाजता अजिंठा चौफुली येथे भुसावळ जाण्यासाठी बसची प्रतिक्षा करत थांबले. जळगाव येथे एस.टी. महामंडळाची बस क्रमांक २० बीएल ३५५३ ठाणे ते मुक्ताईनगर ही बस अजिंठा चौफुलीवर थांबली. या बसमध्ये चढत बोरसे कुटुंबीय चढत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या पर्समधून सोन्याचे दागिने लंपास केले. बसमध्ये किरण बोरसे यांनी सहायक करीत पर्स पाहिली असता पर्सची चैन उघडी दिसली. पर्सची तपासणी केली असता सोन्याचे दागिने दिसले नाहीत. तसेच नणंद मनीषाबाई यांच्या पर्समधूनही दागिने लंपास झाल्याचे समोर आले. महिलांनी बसमध्ये तपास केला असता दागिन्यांचा तपास लागला नाही. सुमारे २ लाख १० हजार किमतीची तीन तोळ्याची सोन्याची पट्टा पोत, २ लाख १० हजार किमतीची तीन तोळे वजनाचे सोन्याचे नेकलेस, २ लाख १० हजार किमतीची तीन तोळे वजनाची सोन्याचा पट्टा पोत असा एकुण ६ लाख ३० हजाराचा मुद्देमाल चोरट्यानी लांबविला. याप्रकरणी बुधवारी तक्रारीनुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपास आहे.