जळगाव : जिल्ह्यात लाचखोरीचे प्रकार वाढताना दिसत असून, आता आणखी एका लाचखोरीचा प्रकार समोर आला आहे. कुसूंबा येथे जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ३ हजार रुपयांची लाच घेताना तलाठी नितीन शेषराव भोई ( ३१) याला मंगळवारी रंगेहाथ अटक केली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२६ वर्षीय तक्रारदाराने त्यांच्या आई व भावाचे नाव सातबारा उताऱ्यावर व स्लॅब रजिस्टरवर नोंदविण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, तलाठी नितीन भोई यांनी त्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागणी केली होती. तडजोडीनंतर ही रक्कम ३ हजारांवर आली. तक्रारदाराने या प्रकरणाची माहिती जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली.
७ जानेवारी रोजी, तलाठी नितीन भोई यांना ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पंचासमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईत पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, फौजदार सुरेश पाटील, पोलीस नाईक बाळू मराठे आणि अमोल सूर्यवंशी यांचा सहभाग होता.
या कारवाईमुळे कुसूंबा गावात खळबळ उडाली असून लाचखोरीविरोधात कठोर पावले उचलण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.