तळोदा : तालुक्यातील आमलाड चौफुली व बहुरूपा रस्त्यावर दोन वेगवेगळ्या ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईत 56 हजार 532 रु चा विमल गुटखा व सुगंधी तंबाखूची अवैध वाहतूक करतांना दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न व औषध विभागाच्या या कारवाईमुळे अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तळोदा तालुक्यातील आमलाड येथील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृह समोर बोरद चौफुली येथे संशयित नरोत्तम आबल्या ठाकरे रा. भुते आकसपूर ता. शहादा हा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या विमल गुटखा व सुगंधी तंबाखूच्या 33 हजार रुपये किमतीचे एकूण 300 पाकिटे अवैधरित्या विक्री करण्यासाठी वाहतूक करतांना आढळून आला.
तळोदा पोलीस स्टेशनला अन्न सुरक्षा अधिकारी आनंद भाऊराव पवार अन्न व औषध प्रसाशन धुळे यांच्या फिर्यादी वरून गु र नं 300/ 2024 अन्वये अन्न सुरक्षा कायदा 2006 व भा न्या सं 2023 च्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दुसऱ्या कारवाईत आमलाड बहुरूपा रस्त्यावर संशयित महेंद्र बाबूलाल चौधरी (रा. मोरवड ता. तळोदा) हा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या विमल गुटखा व सुगंधी तंबाखू च्या एकूण 235 पाकिटे किंमत रुपये 23532 चा अवैधरित्या विक्री करण्यासाठी वाहतूक करतांना आढळून आला म्हणून तळोदा पो स्टे ला अन्न सुरक्षा अधिकारी आनंद भाऊराव पवार अन्न व औषध प्रसाशन धुळे यांच्या फिर्यादी वरून गु र नं 301/ 2024 अन्वये अन्न सुरक्षा कायदा 2006 व भा न्या सं 2023 च्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पो नि राजु लोखंडे यांच्या मार्गदर्शनात पो स ई रवींद्र लोंढे व पो स ई धर्मेंद्र पवार करीत आहेत. अन्न व औषध प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे तालुक्यातील अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. अन्न व औषध प्रशासनाने खूप दिवसांच्या कालावधीत कारवाई केल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.