तळोदा : मोबाईल व पैसे चोरुन नेल्याच्या संशयावरुन बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शहरातील चिनोदा चौफुली जवळ शुक्रवारी रात्री घडली. रंजय कुमार रामदास पासवान (वय ३३, मूळ रा. जितपुर बिहार) असे मृताचे नाव आहे.
बिहारमधील समस्तीपूर येथील रहिवासी देवींदर कुळमी हा येथे उघड्या जागेवर झोपडी करुन कुटुंबासह वास्तव्य करत आहे. परिसरात मध गोळा करुन त्याची तो विक्री करतो. त्याच्याकडे रंजय नावाचा बिहारी हा रात्री त्याच्याकडे आश्रयासाठी आला. देवींदर कुळमी याने त्याला जेवण देऊन झोपण्यासाठी पांघरुन दिले. त्यानंतर काही अवधीनंतर रंजयकुमार पासवान हा मोबाईल व काही पैसे चोरुन फरार झाला, असा संशय देवींदर याला आला.
बसस्टॉपजवळ शोध घेत रंजयकुमार याला पकडून आणले. त्याला पेट्रोलपंपासमोर शॉपिंगसमोर दोराने बांधले. त्यानंतर काठीने बेदम मारहाण केली. या घटनेत रंजय याचा मृत्यू झाला. सकाळी हा प्रकार उघडकीस आला.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक आशीत कांबळे सहायक पोलीस अधीक्षक दर्शन दुगड, स्थानिक गुन्हा अन्वेषण पो. नि. किरणकुमार खेडकर, अकलकुव्वा पो. नि. गुलाबराव पाटील, तळोदा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तळोदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रंजय पासवान याचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात हलविला. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषीत केले. या प्रकरणी मारहाण करणारे चार ते पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.