धाराशिव : माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, तसेच त्यांचे बंधू केशव सावंत यांना ‘तुमचा संतोष देशमुख करु’ अशा धमकीचे पत्र मिळाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेबाबत ढोकी पोलिस स्थानकात तक्रार देण्यात आली आहे.
धनंजय सावंत यांनी सांगितले की, आमच्या कारखान्यावर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाकडे अज्ञाताने हे पत्र देऊन ते आम्हाला द्यायला सांगितले. विधानसभा निवडणुकीपूर्वी धनंजय सावंत यांच्या घरासमोर गोळीबार झाला होता, ज्याची चौकशी अजून केली गेली नाही, असे सावंत म्हणाले.
सावंत पुढे म्हणाले की, प्रशासनाला त्यांचे जीव जाण्याच्या नंतरच कारवाई करायची का ? त्यांना शंभर रुपयांची नोटही पत्रात दिली गेली, यावरून सुपारीच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला आहे.
मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
धनंजय सावंत यांनी या दोन्ही घटनांचा सखोल तपास करण्याची मागणी केली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती सावंत यांनी दिली.