जयपूर येथे 20 डिसेंबर रोजी जयपूर- अजमेर हायवेवर एलपीजी टँकर यू-टर्न घेत होता. त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने त्याला धडक दिली. या अपघातात टँकरच्या मागील बाजूचे आउटलेट नोझल तुटले आणि टँकरमधून वेगाने गॅस बाहेर पडू लागला.
काही वेळातच गॅस बाहेरपडल्याने तेथे पांढऱ्या ढगांची चादर पसरली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी एका वाहनातून ठिणगी पडली आणि स्फोट होऊन टँकरने पेट घेतला. या घटनेत टँकर, कँटरसह 30 हून अधिक वाहनांनी पेट घेतला. या घटनेत 13 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 9 जणांना पळून आपला जीव वाचवण्यात यश आले. तसेच या अपघातात गंभीर भाजलेल्या २३ जणांना सवाई मानसिंग वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.
या गॅस दुर्घटनेतून बचावलेल्या टँकर चालकाने पोलिसांना अपघाताची संपूर्ण कहाणी सांगितली आहे. सोमवारी पोलिसांसमोर हजर झालेल्या टँकर चालकाने सांगितले की, अपघातानंतर टँकरचे आउटलेट नोझल तुटले होते. त्यामुळे कधीही स्फोट होऊ शकतो याची जाणीव त्याला झाली. त्यामुळे त्याने तात्काळ वाहनातून उडी मारून तेथून पळ काढला. टँकर चालकाने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, घटनेनंतर लगेचच त्याने दिल्लीतील टँकर मालकाला फोन करून माहिती दिली आणि त्यानंतर त्याने फोन बंद केला.
या अपघाताचा केवळ जयपूर पोलीसच तपास करत नसून, एसआयटीनेही तपास सुरू केला आहे. सोमवारी एसआयटीने टँकर चालक जयवीरचा जबाब नोंदवला. या टँकर चालक जयवीर, मूळचा मथुरा येथील रहिवाशी आहे. त्याने सांगितले की, यू-टर्न घेतला होता, गाडी उजवीकडे वळत असताना मागून येणाऱ्या एका कंटेनरने त्याला धडक दिली. यामुळे टँकरचे आउटलेट नोझल तुटले. यामुळे टँकरमधून गॅसचे पडायला सुरुवात झाली.
पाठीमागे उभी असलेली सर्व वाहने सुरू असल्याने टँकरचा केव्हाही स्फोट होऊ शकतो, असे त्याच्या लक्षात आले. अशा स्थितीत त्यांनी तत्काळ टँकरमधून उडी मारून तेथून पळ काढला. यानंतर त्यांनी तत्काळ दिल्लीत राहणारे टँकर मालक अनिल पवार यांना फोन करून फोन बंद केला.
पोलीस टँकर चालकाला दोषी मानत नाहीत
जयपूरचे पश्चिमचे डीसीपी अनिल कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात टँकर चालकाला सध्यातरी दोषी मानले जाऊ शकत नाही. प्रथमदर्शनी दोषी कंटेनर चालक आहे, ज्याचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल करून तपास सुरू केला आहे. याप्रकरणी टँकर चालकाची पार्श्वभूमी तपासण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.