---Advertisement---

सफाई कामगारांचा ‘तरुण भारत’ने केलेला सत्कार गौरवास्पद – आमदार भोळे

---Advertisement---

महाराष्ट्र व कामगारदिनी ‘तरुण भारत’ तर्फे आयोजित आणि स्पार्क इरिगेशन प्रा.लि. प्रायोजित समारंभात घंटागाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात

राष्ट्रीय विचारांचे दैनिक म्हणून ‘जळगाव तरुण भारत’ची ओळख आहे. ‘तरुण भारत’ नेहमी समाजोपयोगी उपक्रम राबवित असतो. त्यातच महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त शहरातील सफाई कर्मचाऱ्यांचा दै. तरुण भारतने केलेला सत्कार गौरवास्पद असल्याचे प्रतिपादन आमदार सुरेश भोळे यांनी केले.

‘तरुण भारत’ आयोजित आणि स्पार्क इरिगेशन प्रा.लि. प्रायोजित शहरातील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात गुरुवारी (१ मे) सायंकाळी सफाई कामगार व घंटागाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सत्कार समारंभप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर आमदार सुरेश भोळे, ‘तरुण भारत’चे संचालक अरविंद देशमुख, संपादक चंद्रशेखर जोशी, शाखा व्यवस्थापक भावना शर्मा, विपणन व्यवस्थापक मनोज बोरसे आदी उपस्थित होते. आमदार भोळे पुढे म्हणाले. देशाच्या विकासात कामगारांचा मोठा वाटा आहे. देशाच्या एकूण जीडीपीत कामगारांचे योगदान महत्त्वाचे आहे. कारण, उद्योगधंदे चालवण्यासाठी कामगार महत्वाचे आहेत. कामगारांना त्यांच्या हक्काचा न्याय मिळावा म्हणून मोदी सरकार प्रयत्नशील आहे. त्यांच्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत. त्या योजनांचा लाभ प्रत्येक घटकातील कामगारांना मिळाला पाहिजे, यासाठी सरकार काम करत आहे.

उपस्थित सफाई कामगारांना उद्देशून बोलताना आमदार भोळे पुढे म्हणाले, आपण असंघटित कामगार आहात. असंघटित कामगारांसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. यात अन्न सुरक्षा, विमा योजना, घरांसाठी योजना आदी योजना आहेत. या योजनांतर्गत २०२६ पर्यंत प्रत्येकाचे स्वतःचे घर व्हावे, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे. त्यामुळे या योजनांची माहिती घेत लाभ घ्यावा, असे अवाहनदेखील आमदार भोळे यांनी केले. सूत्रसंचालन आणि मानपत्र वाचन ‘तरुण भारत’चे छायाचित्रकार सुमित देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन ‘तरुण भारत’चे संचालक अरविंद देशमुख यांनी केले.

कामगार हा कुठल्याही जाती-धर्माचा नसतो

देशाच्या प्रगतील कामगारांचा मोठा वाटा असतो. कामगार हा कोणत्याही जाती-धर्माचा नसतो. तो फक्त कामगार असतो. पंतप्रधान मोदीदेखील जात-पात मानत नाहीत. त्यामुळेच त्यांनी सफाई कामगारांचे पाय धूत त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. देश स्वच्छ ठेवण्यात सफाई कामगारांची भूमिका महत्त्वाची आहे, असेही आमदार भोळे म्हणाले.

आमदार भोळेंनी कामगारांसोबत घेतला पावभाजीचा आस्वाद

दै. तरुण भारततर्फे आयोजित सत्कार सोहळ्यात कामगारांच्या गौरवासह त्यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या वेळी आमदार भोळे यांनीदेखील कामगारांसोबत पावभाजीचा आस्वाद घेतला. आमदार भोळे हे सर्वसामान्यांचे लोकप्रतिनिधी म्हणून ओळखले जातात. आमदार असतानादेखील त्यांनी कधी आपल्या पदाचा आव आणला नाही. अतिशय साधेपणाने ते समाजात वावरतात. त्यांच्या या स्वभावाचा प्रत्यय या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा आला. आमदार भोळे यांनी सफाई कार्मचाऱ्यांसोबत फक्त पावभाजीचा आस्वादच नाही घेतला तर त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूसदेखील केली. आमदार भोळे यांच्या या स्वभावाने सफाई कर्मचारी भारावून गेले होते.

कामगारांनी मांडल्या व्यथा

उपस्थित कामगारांनी आमदार भोळे यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या. यात कामगार म्हणाले, सफाई ठेकेदाराकडून कमी रोज दिला जात आहे. तसेच शासनाच्या काही योजनांचा लाभ मिळत नाही. कामगारांच्या या समस्या लक्षात घेत आमदार भोळे यांनी यावर संबंधित ठेकेदारासोबत याविषयी बैठक लावण्याचे आश्वासन दिले. तसेच शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने स्वीय साहाय्यकांना सूचना देत त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत सूचनादेखील त्यांनी दिल्या.

स्पार्क इरिगेशनचे मोलाचे सहकार्य

महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त ‘दैनिक तरुण भारत’तर्फे आयोजित या कामगार सन्मान सोहळ्याला स्पार्क इरिगेशन प्रायव्हेट लिमिटेडचे मोलाचे सहकार्य व प्रायोजकत्व लाभले. उद्योग क्षेत्रात आघाडीवर असलेल्या स्पार्क इरिगेशनकडून नेहमीच समाजोपयोगी उपक्रमांना सहकार्य केले जाते. सहकार्यातून समाजाचे हित या भावनेने स्पार्क इरिगेशन कार्यरत आहे.

दै. तरुण भारत सामाजिक बांधिलकी जोपासतो

राष्ट्रीय विचारांचं दैनिक म्हणून तरुण भारतची ओळख आहे. समाजाचं देणं लागतो हे लक्षात ठेवून दै. तरुण भारत वेगवेगळे समाजोपयोगी उपक्रम राबवित असतो. त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम. समाजात सफाई कामगारांचे योगदान मोठे आहे. तुमच्यामुळे शहर स्वच्छ राखण्यात मोठी मदत होते. त्यामुळे तुमचा गौरव करणे हे आमचे कर्तव्यच आहे, असे प्रतिपादन संपादक चंद्रशेखर जोशी यांनी आपल्या प्रास्ताविकातून केले.

पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यात मृत झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी उपस्थित सर्वांनी दोन मिनिटे मौन पाळत मृतांना श्रद्धांजली अर्पण करून हल्ल्याचा तीव्र निषेधदेखील नोंद‌विण्यात आला.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment