कर थकीत, स्क्रॅप वाहनांचा होणार लिलाव

जळगाव :  परिवहन विभागाच्या वायुवेग पथकाने वेळोवेळी विविध गुन्ह्याखाली अटकावून ठेवलेल्या वाहनांच्या मालकांनी/ताबेदारांनी/ वित्तदात्यांनी लिलावाच्या दिनांकापर्यंत कार्यालयात थकीत करपर्यावरण कर/शासकीय दंडाच्या रक्कमेचा भरणा करुन वाहने सोडवून घ्यावीत. किंवा लिलावास हरकत घ्यावयाची असल्यास 5 ऑगस्टपर्यंत लेखी हरकत घ्यावी. अन्यथा त्यांच्या वाहनांचा लिलाव 6 ऑगस्ट, रोजी दुपारी 4 वाजता करण्यात येईल. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नितीन सावंत यांनी माहिती दिली.

महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ अन्वये नोंदणी तथा कराधान प्राधिका-यांना असलेल्या अधिकारात वाहनमालकांना, ताबेदारांना, वित्तदात्यांना जाहिररित्या कर व दंड भरून वाहने सोडवून घेण्याबाबत अवगत करण्यात येत आहे. परिवहन विभागाच्या वायुवेग पथकाने वेळोवेळी विविध गुन्ह्याखाली अटकावून ठेवलेल्या वाहनांच्या वाहन मालकांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर पोचदेय डाकेने नोटीस पाठविण्यात आलेली आहे. मोटार वाहन कायदा कलम १९८८ मधील तरतुदीनुसार वाहन मालकांनी पत्त्यातील बदल नोंदणी प्राधिका-यास कळविणे बंधनकारक असतांना देखील सदर वाहनांच्या मालकांनी कार्यालयास तसे कळविलेले नाही.

लिलाव करण्यात येणा-या वाहनांची यादी वाहनांच्या प्रकारानुसार नोटीस बोर्डावर चिकटविण्यात आलेली आहे. लिलावात सहभागी होणा-या व्यक्तींनी एकूण सात स्क्रॅप वाहनांकरीता डिमांड ड्राफ्ट बंद लिफाफ्यात 6 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत कार्यालयात जमा करावा. धनाकर्ष (डिमांड ड्राफ्ट) हा Dy RTO, Jalgaon {payable at SBI Main Branch, Jalgaon} या नावे अंदाजित 7 वाहनांच्या बोली रकमेचा सी.टी.एस. मानंकाप्रमाणे नावनोंदणी करुन कार्यालयात वरील दिवशी जमा करणे आवश्यक आहे. लिलावाकरिता एकदा जमा केलेला डीडी कोणत्याही कारणास्तव परत केला जाणार नाही. जाहीर लिलावाचे स्थळ हे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव हे असून जाहीर लिलाव करावयाचे वाहने, अटकावून ठेवलेल्या वाहनांची यादी व स्थळ, लिलावाच्या अटी व शर्ती कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रदर्शित करण्यात येईल. कोणतेही कारण न देता जाहीर लिलाव रद्द करण्याचे अथवा तहकूब ठेवण्याचे अधिकार उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी स्वतःकडे राखून ठेवले आहेत.

वाहन क्रमांक व वाहन प्रकार –विना क्रमांकाच्या 4 काळी पिवळी ऑटोरिक्षा, विना क्रमांकाची 1 ॲपे कार्गो, विना क्रमांकाची 1 लाल मोटार सायकल, विना क्रमांकाची पांढरी क्रिम कलरची पिकअप असे आहेत. असे कराधान प्राधिकारी, तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.