अडावद : उनपदेव- अडावद रस्त्यावर अनघड सागवान लाकडाच्या बेलनची अवैध वाहतुक होत असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली होती. त्या अनुषंगाने येथील वनक्षेत्रपाल प्रशांत साबळे यांनी आपल्या पथकासह २ जणांना मुद्देमालासह अटक केली. हे दोघे सागवान लाकूड कुणाकडे विक्री करतात याचा उलगडा करित वनविभागाने अडावद येथील एका ठिकाणी छापा टाकून सुमारे ५० हजाराचे अवैध सागवान लाकुड जप्त केले आहे. या धडक कारवाईने परिसरात खळबळ उडाली असून लाकडाचा अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
याबाबत माहिती अशी की, सातपुड्याच्या पहाडी दुर्गम भागात साग्यादेव परिसरात राहणाऱ्या रुपा पावरा व महेश पावरा या दोघांना दि. १२ रोजी वनविभागाच्या पथकाने अडावद उनपदेव रस्त्यावर मुद्देमालासह पकडले होते. त्यांना १ दिवसाची वनकोठडी मिळाली होती. सागवान लाकडाची तस्करी करणारे हे दोघे अडावद मध्ये कुणाला अनघड लाकूड पुरवितात याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी काढली. त्या अनुषंगाने आज दि. १४ रोजी दुपारी मन्यार वाडा परिसरात शेख रईस शेख ईसा मन्यार याच्या घरावर छापा टाकून वनक्षेत्रपाल प्रशांत साबळे यांनी वनाधिकारी, कर्मचारी, राज्य राखीव दलाची तुकडी व पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने सुमारे २ हजार नग तयार तसेच अनघड सागवान लाकडाचे बेलन जप्त केले. याची किंमत सुमारे ४० ते ४५ हजार रुपये असून लाकूड खरादण्याचे ५ हजार रुपये किंमतीचे मशिनही जप्त करण्यात आले आहे.
या धडक कारवाईत वनपाल एस.पी.नागणे, योगेश साळुंके, भावना चव्हाण, आर.एस.निकुंभे, एन.जी.सपकाळे, एस.जी.पावरा, एच.के.तडवी, पी.एस. सपकाळे, प्रमिला मराठे, सुमित्रा पावरा, दशरथ पाटील, संजय माळी, राजु पाटील, अजिम तडवी, संजय तडवी, खलिल तडवी, फकरोद्दीन तडवी, शब्बिर तडवी, रमजान तडवी, भरत अढाळके, मनोहर पाटील आदींसह एसआरपी व पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता.