Ram Mandir: अयोध्येतील श्रीराम मंदिराला भेट देण्यासाठी देशभरातून हजारो भाविक अयोध्येत दाखल होत असतात. मंदिराच्या स्थापनेसाठी असलेला ऐतिहासिक संघर्ष आणि त्या संघर्षामुळे मिळालेली विजयाची भावना हा संपूर्ण भारतभरात एकता आणि भव्यतेचा प्रतीक बनेल आहे. श्रीराम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी बांधकामाचा आढावा घेतला आहे.
जानेवारी महिन्यात भव्य राम मंदिराचं उद्घाटन आणि त्यात रामलल्लाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली होती. त्यानंतर वर्षभर मंदिर परिसरातील इतर काम सुरु होती. पण आता ही काम पूर्णत्वाजवळ आली आहेत. यामध्ये मुख्य म्हणजे राम मंदिरासाठी दहा फूट लांबीचा सोन्याचा कळस तयार केला जाणार आहे. हा कळस मंदिराच्या शिखरावर ठेवला जाईल आणि त्याला विशेष महत्त्व दिले जाईल. सोन्याचा कळस म्हणजे केवळ एक सुंदर शिल्पकला नाही, तर तो राम मंदिराच्या ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वाचे प्रतीक असणार आहे.
श्रीराम मंदिराचा कळस आणि महत्त्व
राम मंदिराच्या कळसाची खासियत ही आहे की, तो मंदिराच्या भव्यतेला आणखी एक नवीन उंची देईल. दहा फूट लांबीच्या सोन्याच्या कळसाला विशेषतः धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टीने महत्त्व आहे. मंदिराच्या शिखरावर असलेला हा कळस भक्तांसाठी एक पवित्र प्रतीक ठरेल. कळसाच्या निर्मितीसाठी सुवर्णाचा वापर भारतीय शिल्पकलेच्या उच्चतम परंपरेला अधोरेखित करतो.
मंदिरासंबंधी 5 डिसेंबर आणि 6 डिसेंबर रोजी दोन दिवसीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत नृपेंद्र मिश्रा माहिती देताना म्हणाले की, मंदिराचे बांधकाम ठरलेल्या वेळेत पूर्ण करण्यास आमचे प्राधान्य आहे. मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी १५ मार्च ही तारीख निश्चित करण्यात आली असून तोपर्यंत बांधकाम पूर्ण होईल, असा विश्वास आहे. त्याचप्रमाणे भव्य श्रीराम मंदिराच्या कळसाचा अखेरचा १० ते १५ फूट भाग हा सुवर्णजडित असेल, अशीही माहिती मिश्रा यांनी दिली.
मंदिर आणि मंदिर संकुलाची उभारणी वेळापत्रकाप्रमाणेच होत असल्याचेही नृपेंद्र मिश्रा म्हणाले. मंदिराच्या उभारणीसोबतच सप्तमंडप आणि परकोट्याचा तीन चतुर्थांश भागही बांधून पूर्ण होणार आहे. त्याचप्रमाणे, भाविक सुविधा केंद्र, विजेची व्यवस्था आणि अन्य काही भाग ट्रस्टला हस्तांतरित करण्यात येत आहे. मंदिराची उभारणी प्रगतिपथावर असल्याचे नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितले.