---Advertisement---
मध्य आशियातील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत असून काबूल येथे झालेल्या भीषण एअर स्ट्राइकनंतर मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याचा दावा समोर आला आहे. या घटनेत तब्बल 400 जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप अफगाणिस्तानकडून करण्यात आला असून या पार्श्वभूमीवर पाकिस्तान आणि अफगाणिस्थान यांच्यातील तणाव अधिकच वाढला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री काबूलमध्ये जोरदार स्फोट झाले. स्थानिक वेळेनुसार रात्री सुमारे 9 वाजता झालेल्या या हल्ल्यामुळे संपूर्ण शहर हादरले. रमजानच्या पार्श्वभूमीवर नागरिक मोठ्या संख्येने बाहेर असताना हा हल्ला झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका रुग्णालयावर हल्ला झाल्याचा दावा करण्यात आला असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे.
या घटनेनंतर अफगाणिस्तानकडून पाकिस्तानवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तालिबान प्रवक्त्यांनी पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या हवाई क्षेत्राचे उल्लंघन करून हा हल्ला केल्याचा आरोप करत याला “मानवतेविरुद्धचा गुन्हा” असे संबोधले आहे.
दुसरीकडे, पाकिस्तानने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. पाकिस्तानच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी केवळ दहशतवादी तळांवर अचूक कारवाई केली असून नागरिकांना लक्ष्य करण्यात आलेले नाही. रुग्णालयावर हल्ला झाल्याचा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचेही पाकिस्तानकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, दोन्ही देशांमधील सीमारेषेवर तणाव आधीच वाढलेला होता. गेल्या काही आठवड्यांपासून सीमावादामुळे चकमकी सुरू असून गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर काबूलमधील हल्ल्यामुळे परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या घटनेनंतर युनायटेड नेशन नेही चिंता व्यक्त केली आहे. दोन्ही देशांनी संयम बाळगावा, नागरिकांचे संरक्षण करावे आणि तणाव कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या या घटनेबाबत वेगवेगळे दावे आणि प्रतिदावे समोर येत असून नेमके सत्य काय आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, वाढता तणाव लक्षात घेता परिस्थिती अत्यंत नाजूक बनली असून आगामी काळात या संघर्षाची दिशा काय असेल, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.









