उत्तराखंड: अल्मोडा येथे भीषण अपघात! बस दरीत कोसळल्याने 15 प्रवाशांचा मृत्यू,अनेक जखमी

#image_title

उत्तराखंडमधील अल्मोडा येथे सोमवारी मोठी दुर्घटना घडली. 35 हून अधिक प्रवाश्याना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली आहे. या अपघातात 15 प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे.

या अपघातात बसचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. रस्त्याने जाणाऱ्यांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. अपघाताची माहिती मिळताच एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या पथकांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. जखमींना बसमधून बाहेर काढण्यात येत आहे. घटनास्थळी रुग्णवाहिकाही पाचारण करण्यात आली आहे.

कुठे झाला अपघात?
अल्मोडा येथील मार्चुलाजवळ हा अपघात झाला आहे. ही बस नैनीदांडा येथील किनाथ येथून रामनगरला 40 प्रवासी घेऊन जात होती. गढवाल-रामनगर मार्गावरील सल्ट गावाजवळ चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि काही वेळातच बस खोल दरीत कोसळली. बस दरीत पडताच प्रवाशांनी आरडाओरडा सुरु केला. या अपघातावेळी काही प्रवासी बसमधून बाहेर पडले.

सकाळी नऊच्या सुमारास जखमी प्रवाशांनी नियंत्रण कक्षाला माहिती दिली. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विनीत पाल यांनी सांगितलं की, ‘सल्ट आणि रानीखेत येथून पथके घटनास्थळी पाठवण्यात आली आहेत. आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, नेमका किती लोकांचा मृत्यू झाला याची माहिती बचावकार्य पूर्ण झाल्यानंतरच सांगता येईल.’

ज्या ठिकाणी अपघात झाला तो डोंगराळ भाग आहे. याचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये बस खड्ड्यात पडल्याचे दिसत आहे. जवळून एक छोटी नदी जात आहे. घटनास्थळी स्थानिक लोक उभे असल्याचे दिसून येत आहे.