जळगाव । जळगाव शहरात अपघातांची मालिका अद्यापही थांबण्याचं नाव घेत नाहीय. छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पुलावर आज सकाळी १०.१५ च्या सुमारास झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर तिचे पती जखमी झाले आहेत.
पाचोरा तालुक्यातील राणीचे बांबरुड येथील रहिवासी अशोक सुकदेव गोराडे (वय ६०) व त्यांची पत्नी वंदना (वय ५५) हे शालकाच्या मुलाच्या साखरपुड्यासाठी चांदसर कामतवाडी येथे जात होते. ते दुचाकी क्रमांक एमएच.१९.डीजे.४७९६ ने प्रवास करत होते.
जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पुलावर आज सकाळी १०.१५ च्या सुमारास ट्रक क्रमांक एमएच.२१.एबी.७४६६ ने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात वंदना गोराडे यांचा जागीच मृत्यू झाला, तर अशोक गोराडे गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच वाहतूक शाखेचे कर्मचारी आणि शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ट्रकसह चालकाला ताब्यात घेतले आहे. मृत वंदना गोराडे यांच्या मागे एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे. या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, सततच्या अपघातांच्या घटनांमुळे जळगाव शहरातील रस्ते सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थापनाच्या मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित यंत्रणांनी यावर उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.