जम्मू-काश्मीर: श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला; लाल चौकात ग्रेनेड स्फोट, 10 हून अधिक जण जखमी

#image_title

श्रीनगर : जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. श्रीनगरमधील लाल चौकात दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. ग्रेनेड फेकून केलेल्या या हल्ल्यात 10 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे. लाल चौक हा अत्यंत गजबजलेला परिसर असल्यामुळे चौकात एकच गोंधळ उडाला आहे.

स्फोटात जखमी झालेल्या सर्व लोकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. स्फोटाचा परिसर पूर्णपणे नाकाबंदी करून सील करण्यात आला आहे. जखमींचा आकडा वाढू शकतो असेही सूत्रांचे म्हणणे आहे. काल म्हणजेच शनिवारी श्रीनगरच्या खानयारमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी लष्कर कमांडर उस्मानचा खात्मा केला. उस्मान हा लष्कर कमांडर सज्जाद गुलचा उजवा हात मानला जात होता. उस्मानचे सांकेतिक नाव ‘छोटा वलीद’ असे होते.

तो लष्कर-ए-तैयबाचा काश्मीरमधील सर्वात वरिष्ठ कमांडर मानला जात होता. उस्मानच्या मृतदेहासोबतच मोठ्या प्रमाणात दारूगोळाही जप्त करण्यात आला आहे. गेल्या ४८ तासांत काश्मीरमध्ये तीन वेगवेगळ्या ठिकाणी चकमकी झाल्या. या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या चकमकींमध्ये श्रीनगर, बांदीपोरा आणि अनंतनागचा समावेश आहे.