Terrorist Attack In Jammu And Kashmir : जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास लष्करी गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला. यात २७ नागरिक ठार, तर २० जखमी झाले. मृतकांमध्यो दोन विदेशी पर्यटकांचा समावेश आहे. टीआरएफ या स्थानिक अतिरेकी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या घटनेनंतर सुरक्षा दलाने परिसराला घेरले असून, अतिरेक्यांचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे.
एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, पहलगाम येथे पर्यटक निसर्गाचा आनंद लुटत असताना गवताळ भागात दबा धरून बसलेल्या तीन ते चार अतिरेक्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. जखमी झालेल्या एका महिलेने गोळीबार सुरू असताना कुटुंबीयांना फोनवरून घटनेचा माहिती दिली. यानंतर कुटुंबातील सदस्याने पोलिसांना माहिती दिल्यानंतर घटनास्थळापासून काही अंतरावर तैनात असलेल्या सुरक्षा दलाला याची माहिती देण्यात आली. काही मिनिटातच जवान तेथे पोहोचले, तोपर्यंत अतिरेक्यांनी पळ काढला होता.
पहलगाम हल्ल्यानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी आपत्कालीन बैठक बोलावली, ज्यात आयबी प्रमुख आणि गृहसचिव उपस्थित होते. बैठकीनंतर गृहमंत्री श्रीनगरला रवाना झाले. तत्पूर्वी, त्यांनी पंतप्रधान मोदींना घटनेची सविस्तर माहिती दिली. गृहमंत्री शाह म्हणाले की, निष्पाप नागरिकांवर झालेला हा क्रूर हल्ला भ्याड आणि अत्यंत निंदनीय आहे. भयानक हल्ल्यात सहभागी असलेल्यांना सोडले जाणार नाही. आम्ही दोषींवर कठोर कारवाई करू.
या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण ६ पर्यटकांचा मृत्यू झाल्याच समोर आलं आहे. यात डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय. पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. तर पनवेलमधील दिलीप देसले यांचाही हल्ल्यात मृत्यू झालाय. तर महाराष्ट्रातले एस बालचंद्रू, सुबोध पाटील, शोबीत पटेल हल्ल्यात जखमी झालेले आहेत.
आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या
जखमी झालेल्या एका महिलेने सांगितले की, दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी नाव विचारले आणि हिंदू असल्याची ओळख पटल्यावर गोळीबार केला. अतिरेक्यांनी पर्यटकांना सुरुवातीला त्यांचे नाव विचारले तसेच हिंदू की, मुस्लिम असेही विचारले. हिंदू असलेल्या नागरिकांना लक्ष्य करीत त्यांनी गोळ्या झाडल्या.
दोषींना सोडणार नाही
भ्याड दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र निषेध केला. त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये लिहिले की, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले, त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना आहे. जखमी लोक लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी मी प्रार्थना करतो. या घृणास्पद कृत्यामागील लोकांना सोडणार नाही. त्यांचा नापाक अजेंडा कधीही यशस्वी होणार नाही.
नरेंद्र मोदी, पंतप्रधान
प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत
जिल्हा प्रशासन आणि आरोग्य अधिकाऱ्यांना पहलगाममध्ये दाखल झालेल्यांना त्वरित वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. जखमी पर्यटकांना अनंतनाग येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ला करणाऱ्यांना कठोर शिक्षा दिली जाईल. तसेच पीडितांना आणि राज्यात येणाऱ्या पर्यटकांना प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत दिली जाईल.
मनोज सिन्हा, नायब राज्यपाल
गुन्हेगार अमानुष, घृणास्पद
आमच्या पाहुण्यांवरील हा हल्ला घृणास्पद कृत्य आहे. या हल्ल्याचे गुन्हेगार अमानुष आणि घृणास्पद आहेत. निषेध करण्यासाठी शब्द पुरेसे नाहीत. मृतांच्या कुटुंबीयांबद्दल मी संवेदना व्यक्त करतो. मी माझ्या सहकाऱ्यांशी बोललो आहे आणि ते जखमींच्या व्यवस्थेची देखरेख करण्यासाठी रुग्णालयात आहेत.
उमर अब्दुल्ला, मुख्यमंत्री