मस्कत : ओमानची राजधानी मस्कत येथे मंगळवार, दि. १६ जुलै २०२४ एका मशिदीजवळ झालेल्या गोळीबारात चार जण ठार आणि अनेक जण जखमी झाले. ओमानमधील वाडी अल-कबीर येथील इमाम अली मशिदीजवळ ही घटना घडली. शिया मुस्लिमांच्या कार्यक्रमाला लक्ष्य करण्याचे हल्लेखोराचे उद्दिष्ट होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
ओमानी दहशतवाद विरोधी दले परिस्थिती हाताळत आहेत. सुरक्षा अधिकारी हल्लेखोरांना पकडत असताना ७०० हून अधिक लोक आत अडकल्याची माहिती आहे. अधिकृत निवेदनात, रॉयल ओमान पोलिसांनी सांगितले की, “रॉयल ओमान पोलिसांनी वाडी अल कबीर प्रदेशातील मशिदीच्या परिसरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा सामना केला, ज्यामध्ये चार लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले.”
आपल्या निवेदनात ओमानी पोलिसांनी पुढे सांगितले की, “प्राथमिक माहितीनुसार, परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्व सुरक्षा उपाय आणि उपाययोजना करण्यात आल्या असून, पुरावे गोळा करणे आणि तपास करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. रॉयल ओमान पोलिस मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करतात.