ठाकरेंनी भर सभेत जागावाटपावरुन काँग्रेस-पवारांना सुनावले!, “आता मुख्यमंत्रीपद…”

मुंबई : आधी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवा मग पुढे जा, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भर सभेत काँग्रेस-पवारांना सुनावले. शुक्रवारी मुंबईतील षणमुखानंद सभागृहात महाविकास आघाडीचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी ते बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले की, “कोणत्याही परिस्थिती मी महाराष्ट्राचं हित जपणार, ही शपथ आपण सर्वांनी घेतली पाहिजे. आपल्यात काड्या करणारे लोकं त्यांच्या यूतीमध्ये बसले आहेत. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? असं विचारतात. पण मी आज सर्वांसमोर सांगतो की, पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवार साहेबांनी त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा. माझा त्याला पाठिंबा असेल.”

“मी माझ्यासाठी लढतो ही भावना माझ्यात नाही. ज्याक्षणी मी मुख्यमंत्रीपद सोडलं त्यानंतर मी माझ्या स्वार्थासाठी नाही तर महाराष्ट्राच्या स्वार्थासाठी लढतो आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार, हे सर्वांसमोर जाहीर करून टाका. मी पाठिंबा देणार. पण जो अनुभव आम्ही भाजपसोबत यूतीत असताना घेतला आहे त्याची पुनरावृत्ती मला नको आहे. आम्ही २०-३० वर्ष यूतीमध्ये असताना आमच्या अशाच बैठका व्हायच्या. त्यामध्ये ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री होणार असं जाहीर केलं जायचं. हेच धोरण आम्ही एकमेकांच्या पायावर धोंडे पाडण्यात टाकायचो. यात पाडापाडीचं राजकारण व्हायचं. त्यामुळे आधी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवा मग पुढे जा. पण या धोरणाने जाऊ नका,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.