जळगाव : राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. जामनेर तालुक्यातील लिहा तांडा येथे भंडाऱ्यानिमित्त ना. गिरीश महाजन आले असता, गावातील तरुणांनी त्यांचा चिखलमय रस्त्यातून प्रवास घडविला व गावात किती विकास झाला याचे दर्शन त्यांना प्रत्यक्ष घडवून दिले असा दावा करण्यात येत होता. याला उत्तर देताना विरोधक हतबल झाल्याने याचा विरोधकांकडून विपर्यास करण्यात येत असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी सांगितले.
याबाबत मंत्री गिरीश महाजन पुढे म्हणाले की, विरोधक हतबल झाले असल्यानेच त्यांच्याकडून टीका केली जात आहे. लिहा तांडा हे तालुक्यातील सर्वात मोठे गाव असून हे ८० टक्के गाव भाजपचे आहे. या गावात विविध विकास कामे सुरु असून काही मंजूर झाली आहेत. मोटारसायकलने कार्यकर्त्याच्या पाठीमागे बसून सरपंचाच्या घरी जात होतो . पाऊस पडलेला असल्याने एका ठिकाणी डबके तुंबलेले होते. त्यातून मी कार्यकर्त्यास गाडी टाकण्याचे सांगितले. त्याने तेथून गाडी जोरात नेली, याचा विरोधक विपर्यहास करत आहेत. यावरुन सोशल मीडियाद्वारे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तालुक्यातून सर्वात जास्त मत मला या गावातून मिळतात. घोडा मैदान जवळ आहे. तुम्ही ताकदीने लढा, मी सहा वेळा आमदार झालो आहे, आता भाजपाच तिकीट ज्याला मिळेल त्याच्या विरोधात लढा असा सल्ला मंत्री महाजन यांनी विरोधकांना दिला. लोकसभेत आम्हाला किती मते मिळाली याची त्यांना कल्पना असल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
तर आम्ही त्यांचे स्वागत दिवाळीत उरलेल्या फटक्यांनी करु
प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी जेष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांचा दिवाळी नंतर भाजप पक्ष प्रवेश होणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले असल्याने त्याबाबत ना. महाजन यांची प्रतिक्रिया विचारली असत ते मंत्री महाजन यांनी याची त्यांना कल्पना नसल्याचे सांगितले. देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितले असेल तर खरेच असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. लागलीच त्यांनी आम्ही दिवाळीत उरलेले फटाके फोडून त्यांचे स्वागत करु असे उपरोधिक टीका केली.