जळगाव : जिल्ह्यात गणेश चतुर्थीला बाप्पाचे आगमन झाले आणि त्यानंतर उद्या (१७ सप्टेंबर) रोजी अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन होत आहे. यापार्श्वभूमीवर प्रशासनाने गणेश विसर्जनाची संपूर्ण तयारी पूर्ण केली आहे. यात कडेकोट पोलीस बंदोबस्त, ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे मिरवणुक मार्गावर करडी नजर ठेवली जाणारा आहे. तर महापालिकेतर्फे मेहरूण तलाव येथे भाविकांना श्री गणेशाच्या विसर्जनाची सुविधा करण्यात आली आहे.
जळगाव शहरात श्री गणेश विसर्जन मिरवणूक सकाळी दहा वाजता कोर्ट चौकांत मानाच्या गणपतीची आरतीने प्रारंभ होईल. तसेच भुसावळ येथील मुख्य मिरवणुक ही नरसिंह मंदिराजवळ आरतीनंतर सुरु होईल. रावेर येथे पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून मुख्य मिरवणुकीला प्रारंभ होईल.
जळगाव शहरात श्री गणेशाच्या विसर्जन मार्गाची महापालिकेच्या वतीने डागडुजी करण्यात येत आहे.
जळगाव शहरात विसर्जनमार्गावर ८३ सीसीटीव्ही कॅमेरे व ५ ड्रोनच्या साहाय्याने नजर ठेवली जाणार आहे. भुसावळ येथील जामा मशिद या परिसरात नगरपालिकेच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. दरम्यान, रावेर येथे मुख्य मिरवणुकीच्या मार्गात व तसेच संवेदनशील परिसातत पूर्वीपासूनच कॅमेरे लावण्यात आले आहेत.
मेहरूण तलावावर होणार विसर्जन
गिरणा पम्पिंग व निमखेडी गावालगत गिरणा नदी काठ व पात्र हे धोकेदायक असल्याने येथे महापालिका प्रशासनातर्फे श्री गणेशाचे विसर्जनाची व्यवस्था करण्यात आलेली नाही. येथे श्रींचे विसर्जन करण्यास बंदी घालण्यात आली असल्याचे मनपा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे. मेहरूण तलाव व शहरात 100 जीवन रक्षक, दहा तराफे, दोन बोटी, पंधरा पट्टीचे पोहणारे सज्ज ठेवण्यात आले आहेत.
भुसावळ येथे १०० पट्टीचे पोहणारे दोन्ही बाजूला बोट आपदा मित्र तसेच नदीवर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. काही अप्रिय घटना घडू नये याकरिता भुसावळ नगरपालिका श्री गणेशाचे विसर्जन आपल्या कर्मचाऱ्यांकडून करीत असते.
निर्माल्य संकलन
जळगावात सहा ठिकाणी निर्माल्याचे संकलन करण्यात येईल. तर भुसावळ येथे तापी नदीच्या काठावर निर्माल्य जमा करण्याची व्यवस्था झालेली आहे. मिरवणूकीवर लक्ष ठेवण्यासाठी जळगाव शहरात त्या ठिकाणी मचान उभारण्यात येत आहे. यासह स्थानिक पोलिसांच्या बंदोबस्त यांच्यासह क्यू आर टी, आरसीपी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी हे मुख्यतः संवेदनशील भागात यांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.