वाहननिर्मिती क्षेत्रामुळे देशाचे भविष्य बदलणार, भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोच्या उद्घाटनप्रसंगी मोदींचे प्रतिपादन

वाहननिर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्यास इच्छुक गुंतवणूकदारांसाठी भारतात अपार संधी आहे. वाहन खरेदी करणारे जगातील सर्वाधिक ग्राहक देशात आहे. गेल्या वर्षात भारतीय वाहननिर्मिती क्षेत्रात १२ टक्क्यांनी वाढ झाली. भारत लवकरच जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने अग्रेसर असून, विकसित भारतात वाहननिर्मिती क्षेत्रासाठी अभूतपूर्व संधी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. राजधानी दिल्लीतील प्रगती मैदान येथील भारत मंडपम्मध्ये देशातील सर्वांत मोठी ऑटो प्रदर्शनी भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोचे शुक्रवारी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. देश, विदेशातील वाहननिर्मिती कंपन्यांच्या प्रतिनिधींना संबोधित करताना मोदी म्हणाले, भारतातील वाहननिर्मिती क्षेत्र भविष्यातील बदलासाठी तयार आहे. अनेक देशाच्या लोकसंख्येइतकी वाहनविक्री भारतात वर्षभरात होते.

प्रदर्शनीत काय खास ?

भारत मोबिलिटी एक्स्पो १७ ते २२ जानेवारीदरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या काळात देशातील आणि जगभरातील वाहन उत्पादक कंपन्या नवीन कार तसेच दुचाकी लाँच करतील. प्रत्येक हॉलमध्ये प्रत्येक ऑटोमोबाईल उत्पादकाचे विविध प्रदर्शन असतील.

सरकारच्या योजनांमुळे उद्योगाला चालना

बदलत्या तंत्रज्ञानाचा प्रभाव वाहननिर्मिती उद्योगावरही दिसून येत असून, या क्षेत्रात मोठे बदल पाहायला मिळत आहेत. या उद्योगासाठी लागणारी सर्व मदत सरकार उपलब्ध करून देईल, अशी हमी यावेळी मोदी यांनी दिली.