मालेगाव येथे टायपिंग परीक्षेसाठी गेलेल्या तरुणाचा आढळला मृतदेह

चोपडा : तालुक्यातील चहार्डी येथील कुलदीप उर्फ भटू सुधाकर पाटील हा विद्यार्थी मालेगाव येथील तंत्रनिकेतन महाविद्यालयात टायपिंगच्या परीक्षेसाठी गेला होता. तो तीन दिवसांपासून बेपत्ता झाला होता. त्यांचा मृतदेह मालेगाव छावणी पोलिस ठाण्यासमोर बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या खोलीत कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. या विद्यार्थ्याने स्वतःच्या शर्टने गळफास घेतल्याचे उघड झाले आहे.

कुलदीप हा मालेगाव तंत्रनिकेतन महाविद्यालयात १९ जून रोजी टायपिंगची परीक्षा देण्यासाठी गेला होता. त्याने दुपारी ११ ते १२.३० पर्यंत टायपिंगची परीक्षा दिली. यानंतर त्याने परीक्षा चांगली झाल्याचे कुटुंबीयांना सांगितले. परंतु, कुलदीप घरी परतला नाही. यामुळे त्याच्याशी वारंवार मोबाईलद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु, त्याचा मोबाइल बंद असल्याने संपर्क होत नव्हता.

दुसऱ्या दिवशी कुटुंबीय व नातेवाइकांनी त्याचा मालेगावी व इतरत्र शोध घेतला. मात्र, कुलदीप कोठेही आढळून आला नाही. यानंतर कुटुंबीयांनी कॅम्प पोलिस ठाण्यात कुलदीप बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. छावणी पोलिस ठाण्यासमोर बांधकाम सुरू  आहे. शनिवारी २२ जून रोजी सकाळी या बांधकाच्या एका दुकानाच्या खोलीतून दुर्गंधी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.  पोलिसांसह नागरिकांनी या खोलीत प्रवेश केला असता खोलीतील पाइपाला शर्टने गळफास घेतलेला तरुण दिसून आला. त्याचा मृतदेह कुजलेला होता. याची माहिती बेपत्ता कुलदीपच्या नातेवाइकांना देण्यात आली असता त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाहिला असता तो कुलदीपचाच असल्याचे उघड झाले. त्यामुळे कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला.

कुलदीप टायपिंगची परीक्षा देण्यासाठी आला होता, तसेच परीक्षा चांगली गेल्याचा निरोप देतो. त्यानंतर मात्र त्याचा मोबाईल बंद येतो. तीन दिवसांनंतर त्याचा गळफास घेतलेला मृतदेहच आढळून येतो. यामुळे कुटुंबीयांसह नातेवाईक हादरले आहेत. कुलदीपने जीवनप्रवास का संपवला? याचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.