राधा-कृष्णाचे एकरूप दर्शन घडविणारे ‘इंदूरचे बाँकेबिहारी मंदिर’

तरुण भारत लाईव्ह । प्रा.डॉ.अरुणा धाडे । इंदूरला गेल्यावर तिथला राजवाडा हौशी पर्यटकांना आकर्षित करतो, पण त्याच राजवाड्याच्या बाजूला असलेले श्रीकृष्ण मंदिर ईश्वरीय आस्था असणार्‍यांना नतमस्तक करतं. ‘बॉंकेबिहारी’ नावाने प्रसिद्ध असणारं हे मंदिर कृष्णभक्तांच्या श्रद्धेचं सुंदर प्रतीक आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या होळकरकालीन राजवाड्याएवढीच या मंदिरालासुद्धा ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. इंदूरचे सुभेदार, मराठा सरदार मल्हारराव होळकर यांच्या द्वितीय पत्नी ‘हरकूबाई साहेबांनी कृष्ण मंदिर बांधले’, असा कागदोपत्री उल्लेख आहे. त्या कृष्णभक्त होत्या. महानुभाव पंथाच्या अनुयायी होत्या. त्यांना प्रभुदर्शन सहजच घडावे म्हणून राजवाडा आणि मंदिर यांची आखणी अशी केली गेली की जेणेकरून राजवाड्यातून भगवत दर्शन होईल. मंदिर बांधकामाचं निश्चित सन ज्ञात नसले तरी 1832च्या पूर्वीचे हे मंदिर असावे असा कयास आहे. या मंदिरातील कृष्णविग्रह वृंदावनातील बॉंकेबिहारी विग्रहासारखीच असल्याने मल्हारराव होळकरांनी या मंदिराचे नाव ’बॉंकेबिहारी मंदिर’ ठेवले. पुढे तेच नाव सर्वमुखी झाले.

मंदिरात श्रीकृष्णाचे तीन विग्रह आहेत. सोबतच दत्तात्रयांचासुद्धा विग्रह आहे. मंदिराच्या संस्थापिका महानुभावी होत्या म्हणून मंदिरातील पूजापद्धती महानुभाव पद्धतीची आहे. मंदिरात पंचावतारांची (श्रीकृष्ण, दत्तात्रेय, चक्रपाणी महाराज, चक्रधर महाराज आणि गोविंदप्रभू) पूजा केली जाते. विशेष म्हणजे इथल्या सर्व मूर्ती ब्रजभूमीतील पाषाणात घडविल्या आहेत.
आपण बघतो की बहुतांश मंदिरात कृष्णसह राधा पण पूजली जाते, पण या मंदिरात राधेची पूजा केली जात नाही. त्याचं कारण असं सांगतात की, राधेला इथे ’कृष्णसेविका’ मानले आहे आणि श्रीकृष्णाला ’ईश्वरीय रूप’ मानलं आहे म्हणून मंदिरात राधेची कुठेही मुर्ती नाही. ती सामान्य भक्तच आहे.
मंदिराचे प्रवेशद्वार तसे साधारणच आहे. पण आत गेल्यावर काळ्या ग्रॅनाइट आणि लाकडाचे मराठा शैलीतील आकर्षक बांधकाम दृष्टीस पडते. रेखीव भूमितीय रचनेचा विस्तारित मंदिर परिसर भव्यतेची ओळख सांगतो. लाकडावर सुंदर नक्षीकाम आहे. मंदिराचा घुमट पहिल्या मजल्यावरील इमारतीच्या आत आहे. दोन मजली मंदिरात देवांच्या मूर्ती पहिल्या माळ्यावर आहेत.

जवळजवळ वर्षे जुनी परंपरा असलेली श्रीकृष्ण जन्माष्टमी आजही तेवढ्याच उत्साहात साजरी केली जाते. वृंदावन शैलीची रंगउधळी ‘रंगपंचमी’ जल्लोषात खेळली जाते. महानवमी, चक्रपाणी आणि दत्त जयंतीसुद्धा साजरी केली जाते.
मंदिरातील नित्याच्या तीन आरत्या म्हणजे कृष्णभक्तांसाठी सुंदर सोहळ्यात सहभागी होण्यासारखेच आहे. सकाळच्या श्रृंगार आरतीसाठी बॉंकेबिहारीला सुंदर ’सजविले’ जाते. मध्यान्हच्या आरतीवेळी वेगवेगळे ‘राजभोग’ बालगोपाळाला अर्पण केले जातात आणि शेवटीची ‘शयन’ आरती असते.
भगवान विष्णूच्या अनेक रुपांपैकी एक श्रीकृष्ण अवतार आहे. तसेच श्रीकृष्णाच्या अनेक रुपांपैकी एक ‘बॉंकेबिहारी’ रूप आहे. याची एक मजेदार कथा सांगितली जाते. संगीत तानसेन यांचे गुरू ‘श्रीहरदास’ हे कृष्णाचे निःस्सीम भक्त होते. एकदा राधाकृष्ण त्यांच्याकडे आले. तेव्हा त्यांच्या राहण्याची व्यवस्था कशी करावी? अशा विवंचनेत होते. कृष्णाच्या राहण्याची व्यवस्था मी करू शकतो पण राधेची करण्यात मी असमर्थ आहे, असे त्यांनी श्रीकृष्णाला सांगून टाकले. तेव्हा श्रीकृष्णाने ‘राधाकृष्ण’ ‘एकरूप’ होत हरदासांना दर्शन दिले. तेच ‘बॉंकेबिहारी’ रूप आहे. या मंदिरात ‘राधा’ दृश्य स्वरूपात वेगळी नसली तरी बॉंकेबिहारीत राधा आणि कृष्ण असे दोन्ही प्रतिबिंब भासतात.