---Advertisement---
पाचोरा (प्रतिनिधी) : स्वातंत्र्याचे 75 वर्ष उलटले. मात्र पाचोरा तालुक्यातील मोहलाई गावात लालपरी पोहचली नव्हती. बाजारासाठी गावकऱ्यांना तब्बल सहा किमी लांब असलेला नगरदेवळा गाठावे लागत होते. ग्रामपंचायतीने गावात बस फेरी सूरू करण्याची मागणी लावून धरली. मागणीला यश आले अन् पहिल्यांदाच लालपरी गावात आली.
लालपरीचा स्वागतासाठी गाव एकवटले. यावेळी युवा कार्यकर्ते हर्षवर्धन रावसाहेब पाटील यांच्याहस्ते बस वाहक चालकाचे शाल-श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. सोयगाव तालुक्यातील मोहलाईचे सरपंच संदीप राठोड, माजी सरपंच राजेंद्र दुधे, आखतवाड्याचे माजी सरपंच संजय परदेशीं, शुभम धनगर, पोलीस पाटील यांनी बसचालक ज्योतीराम महाजन, वाहक पंकज पाटील स्वागत केले.
जळगाव जिल्हा आणि संभाजीनगर जिल्ह्यात येणाऱ्या मोहलाई हे गांव अर्धे गांव जळगाव जिल्ह्यात तर बाकीचे छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात येते ग्रामपंचायत कारभार हा छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याच्या सोयगाव तालुक्यातील मोहलाई गावात चालतो, या गावात बस सेवा नसल्याने येथील ग्रामस्थ, रुग्ण, बाजारासाठी तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनींना शालेय शिक्षणासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती. या गावांमधील विद्यार्थी व विद्यार्थिनी नगरदेवळा येथे ये-जा करतात. बस सेवा सुरू झाल्याने दररोज शिक्षणासाठी ये-जा करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांसाठी सोयीचे झाले आहे.
या भागात बस सेवा सुरु करण्यात यावी अशी मागणी होती. त्या साठी शुभम धनगर यांनी पाठपुरावा केला आणि त्याला यश आले आहे. आता बससेवा सुरू झाल्याने येथील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे. आता ही बस नगरदेवळा येथुन सकाळी 11:00 वाजता आणि सायंकाळी 5:00 वाजता विद्यार्थी आणि प्रवासी घेऊन मोहलाई पर्यंत जाऊन परत येणार आहे.