जळगाव :ऑनलाइन टास्कच्या माध्यमातून भरपूर नफा कमविण्याच्या सायबर ठगांनी दाखविलेल्या आमिषात येथील व्यावसायिकाला ८ लाख ७६ हजार ३६३ रुपयांचे चंदन लावल्याचा प्रकार सोमवार, १ रोजी उघडकीस आला. फसवणूक झाल्याची खात्री झाल्याने या प्रकरणी तक्रारीनुसार सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारदार हे तीस वर्षीय तरुण असून व्यावसायिक आहेत. ते शहरात सिद्धिविनायक नगर येथे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. २२ जून ते १ जुलै दरम्यान या युवकाच्या व्हॉटसअॅप क्रमांकावर निमीशा रघुराम नावाच्या महिलेने तिच्या टेलीग्राम खात्यावरून संपर्क साधला. त्यानंतर रॅक अॅप ५२५३ या टेलीग्राम चॅनलकडून संपर्क साधत तक्रारदार यांचेकडून ८ लाख ७६ हजार ३५३ रुपये रकमेचा स्वीकार केला.
दरम्यान, गुंतवणूक केलेल्या रकमेवर परतावाही नाही किंवा नफाही मिळत नसल्याने तक्रारदार यांनी संबंधित महिलेशी संपर्क साधला असता झाला नाही. तसेच त्यानंतर फोन कॉल येणेही बंद झाले. फसवणूक झाल्याची खात्री झाल्याने तक्रारदार यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत कैफियत मांडली. या प्रकरणी तक्रारीनुसार फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम करीत आहेत
अनोळखी व्यक्तींवर ठेवू नका विश्वास
कोणत्याही अनोळखी व्यक्तीने दिलेल्या आमिषाला बळी पडू नका. ज्यांच्याशी कधीही परिचयही नसतो अशांपासून सावध राहा. असे फसवणूक करणारे बऱ्याच वेळा वारंवार संपर्क करतात. संवाद साधून ग्राहकाला बोलते करतात. घर बसल्या भरपूर नफा कमविण्याचे आमिष दाखवितात. अशा वेळी अनेक जण संशयितांच्या जाळ्यात अडकतात आणि पैशांची गुंतवणूक करून फसगत करून घेतात. नागरिकांनी अशा अनोळखी व्यक्तींवर किंवा त्यांच्या भूलथांपावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन सायबर पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.