केंद्राने संसदेत संमत केला दूरसंचार कायदा , नवीन सिम घेण्याआधी सावधान , नवीन नियम जाणून घ्या.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने संसदेत संमत केलेला दूरसंचार कायदा, २०२३ ची अंमलबजावणी लागू करण्यात आली आहे. २६ जून २०२४ पासून आता दूरसंचार वापरावर नवीन नियम लागू होणार आहेत. नवीन नियमांनुसार सिम खरेदी आणि वापराबाबत देशात कायद्यातील अनियमिततेबाबत शिक्षा व दंडाची तरतूदही करण्यात आली आहे.

दरम्यान, दूरसंचार विधेयक डिसेंबर २०२३ मध्ये संसदेत मंजूर करण्यात आले असून या कायद्यात ६० हून अधिक कलमे आहेत. या कायद्याद्वारे देशातील कम्युनिकेशन मीडियाचे नवीन पद्धतीने नियमन होणार असूनआतापर्यंत हे काम शतकानुशतके जुन्या ब्रिटिशकालीन कायद्याच्या मदतीने केले जात होते.

या कायद्यात संप्रेषण माध्यमे (फोन नेटवर्क, इंटरनेट) स्थापित करणे, त्यांचा वापर, त्यांच्यामध्ये अडथळा आणण्यासाठी शिक्षा आणि त्यांचे नियमन यासंबंधीच्या तरतुदी आहेत. संपर्क माध्यमाचा कोणीही गैरवापर करू नये याकरिता तरतूद करण्यात आली आहे. कायद्यानुसार आता भारतातील कोणतीही व्यक्ती विहित मर्यादेपेक्षा जास्त सिमकार्ड ठेवू शकणार नाही.

या कायद्यानुसार आता व्यक्ती फक्त ९ सिम खरेदी करू शकणार आहे. हे सिम त्याच्या ओळखपत्राशी जोडले जाईल. ही मर्यादा जम्मू-काश्मीर आणि ईशान्येमध्ये फक्त ६ ठेवण्यात आली आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास ५० हजार रुपये ते २ लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे.