विमानतळावर सुरू होती चेकिंग, मग व्यक्तीने CISF अधिकाऱ्याला विचारला असा प्रश्न, उडाली खळबळ

कोची :  केरळमधील कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा तपासणीदरम्यान एका व्यक्तीने बॉम्बबाबत केलेली टिप्पणी त्याला महागात पडली. कोचीनहून मुंबईला जाणारा हा व्यक्ती विमानतळावर पोहोचल्यावर सुरक्षा तपासणीसाठी रांगेत उभा राहिला. मात्र सुरक्षा तपासणीदरम्यान त्याने सीआयएसएफ अधिकाऱ्याला विचारले की त्याच्या बॅगेत बॉम्ब आहे का? या वक्तव्यानंतर मुंबईकडे जाणाऱ्या एका प्रवाशाला अटक करण्यात आली.

कोचीन इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड ने रविवारी सांगितले की, मनोज कुमार (42) यांनी बॅगेज चेक काउंटरवर सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (CISF) अधिकाऱ्याला ‘धमकीदायक’ टिप्पणी केली होती. मनोज कुमार रविवारी सकाळी एअर इंडियाच्या विमानाने कोचीनहून मुंबईला जाणार होते.

सीआयएएलने एका निवेदनात म्हटले आहे की, विमानात चढण्यापूर्वी सुरक्षा तपासणीदरम्यान कुमार यांनी सीआयएसएफ अधिकाऱ्याला विचारले, ‘माझ्या बॅगेत बॉम्ब आहे का?’ यामुळे तेथील लोकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते, त्यानंतर विमानतळाच्या सुरक्षा दलाला सतर्क करण्यात आले. विमानतळ प्राधिकरणाने सांगितले की, बॉम्ब शोधक आणि निकामी पथकाने प्रवाशांच्या केबिन आणि सामानाचीपुन्हा तपासणी केली.

सीआयएएलने सांगितले की, बीडीडीएसने तपास पूर्ण केल्यानंतर, कोणतीही अनियमितता किंवा धमक्या आढळल्या नाहीत. त्यानंतर कुमारला या प्रकरणातील पुढील तपासासाठी स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या बॉम्ब थ्रेट असेसमेंट कमिटीने (बीटीएसी) सांगितले की, बॉम्बची माहिती विश्वासार्ह नाही, परंतु तरीही आम्ही सुरक्षिततेसाठी परिस्थितीची तपासणी केली. CIAL ने सांगितले की BTAC ने आपली कारवाई पूर्ण केली, ज्यामुळे विमान वेळेवर निघाले.