“राहुल गांधी, यांनी भारतीय लष्कराला राजकारणात ओढू नये”; हवाई दलाच्या माजी प्रमुखांनी काँग्रेसला सुनावलं

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाचे माजी प्रमुख आरकेएस भदौरिया यांनी गुरुवार, दि.४ जुलै २०२४ अग्निपथ योजनेबद्दल खोट्या अफवा पसरवल्याबद्दल लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधींनी राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावर लोकसभेत बोलताना कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या अग्निवीर अजय कुमारच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात आली नसल्याचा खोटा दावा केला होता.

राहुल गांधींच्या या दाव्यानंतर भारतीय लष्कराने अग्निवीर अजय कुमार यांच्या कुटुंबाला जवळपास एक कोटींची आर्थिक मदत दिली असल्याची माहिती दिली. सोबतचं जवानाच्या कुटुंबाला आणखी ६५ लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय लष्कराने दिली. लष्कराने दिलेल्या या माहितीमुळे राहुल गांधींचा संसदेतील खोटेपणा उघड झाला.

राहुल गांधी यांच्या याचं दाव्यावर भदौरिया यांनी टीका केली. भदौरिया यांचे नाव न घेता ते म्हणाले की, “संसदेत अग्निवीर योजनेवर बरीच चर्चा झाली. संरक्षणमंत्र्यांचा एक कोटी रुपये आधीच दिल्याचा दावा खोटा असल्याचा वाद आता निर्माण केला जात आहे. त्यांनी याबद्दल माफी मागितली पाहिजे कारण सत्य हे आहे की अजय सिंहच्या कुटुंबाला सुमारे ९८ लाख रुपये आधीच दिले गेले आहेत आणि ६७ लाख रुपये आणखी दिले जातील. त्यामुळे राजनाथ सिंह यांचे वक्तव्य खोटे असल्याचा दावा करणे पूर्णपणे चुकीचा आहे.”

हा भावनिक मुद्दा असून लष्कराने अशा प्रकारच्या राजकारणात पडू नये, असे ते म्हणाले. माजी वायुसेना प्रमुखांनी यावर भर दिला की अग्निवीर ही एक विचारपूर्वक योजना आहे आणि व्यापक चर्चेनंतर त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. ते म्हणाले की, योजनेंतर्गत भरती झालेल्यांना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाच्या (गुणवत्तेबाबत) कोणालाच शंका नसावी. या योजनेंतर्गत तयार झालेले सैनिक कोणत्याही दृष्टिकोनातून सामान्य सैनिकापेक्षा कमी नाहीत. ते सामान्य सैनिकांप्रमाणेच युद्धादरम्यान काम करतील.