सहकार विकणे आहे….!

तरुण भारत लाईव्ह न्यूज । चंद्रशेखर जोशी । जळगाव जिल्ह्यास सहकाराची एक परंपरा होती. सहकारी संस्थांचे मोठे जाळे या जिल्ह्यात होते. माजी मंत्री, विधानसभेचे माजी अध्यक्ष स्व. मधुकरराव चौधरी, स्व.जे.टी. महाजन, स्व. प्रल्हादराव पाटील, स्व. मुरलीधर आण्णा पवार, स्व. ओंकारआप्पा वाघ यांच्यासह अनेकांनी या चळवळीची ज्योत तेवत ठेवली. सहकाराचे जाळे केवळ पश्‍चिम महाराष्ट्रातच नाही तर खान्देशातही उत्तमरित्या पसरले होते. अनेक सहकारी संस्था जोमाने आपापल्या क्षेत्रात काम या धुरिणांच्या नेतृत्वाखाली करत होत्या. संस्थांमध्ये हजारो हातांना काम होते. या संस्थांच्या परिसरात अनेक लहान, लहान पूरक उद्योग सुरू होते. तेथेही अनेकांच्या हाताला काम मिळत होते. ‘विना सहकार नही उद्धार’ हे ब्रीद खर्‍या अर्थाने जळगाव जिल्ह्यातील काही तालुक्यात जोपासले जात होते.

चाळीसगाव तालुक्यात बेलगंगा सहकारी कारखाना, एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील वसंत सहकारी साखर कारखाना, फैजपूर परिसरातील मधुकर सहकारी कारखाना, मुक्ताईनगरचा संत मुक्ताई साखर कारखाना, चोपडा तालुक्यातील सहकारी साखर कारखाना त्याच जवळची सूत गिरणी यासारखे सहकारातील उद्योग म्हणजे या जिल्ह्याचे वैभव होते. या साखर कारखान्याच्या माध्यमातून प्रचंड साखर निर्मिती जळगाव जिल्ह्यातून होत असे. कारखान्यांच्या परिसरात प्रचंड ऊस लागवड केली जात असे. आजही बर्‍याच भागात उसाचे पिक घेतले जाते मात्र त्या उत्पादकांवर अन्यायच होत असतो. मात्र हळूहळू चित्र बदलत गेले. हे साखर कारखाने एक-एक करून बंद होत गेले. दूध संघाचीही अनेक वर्षे हीच परिस्थिती होती.

मात्र एनडीडीबीने मदतीचा हात दिल्याने संस्था तरली, दूध उत्पादकांना न्याय मिळतोय. मात्र आजची परिस्थिती पाहता काही वेगळेच चित्र दिसते. गेल्या काही वर्षांपासून तर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राची वाट लागल्याचेच दिसून येत आहे. काही वर्षांपूर्वी मुक्ताईनगरच्या सहकारी साखर कारखान्याची राज्य सहकारी (शिखर बँक) साखर कारखान्याकडून विक्री झाली, त्यानंतर चाळीसगावच्या बेलगंगाची विक्री झाली. आता मधुकर सहकारी साखर कारखान्याची पाळी आहे. याला मोठ्या प्रमाणात विरोध होतोय. जिल्हा बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाच्या माध्यमातून हा घाट घातला जातोय. मधुकरची जिल्हा बँकेकडे ५८ कोटींची थकबाकी आहे. ती वसुलीसाठी हा पर्याय शोधला जात आहे. अगोदर कारखाना विक्रीचा प्रयत्न होता त्याला विरोध झाल्याने २५ वर्षे भाडेकराराचा पर्याय पुढे आला. ‘मधुकर’ साखर कारखाना या भागाचा अर्थव्यवस्थेचा कणा व केंद्रबिंदू आहे.

उत्तर महाराष्ट्रात ४२ वर्षे अखंडपणे सुरू असल्याची परंपरा या कारखान्याने कायम ठेवली असून, ऊस उत्पादक शेतकर्‍यांचा विश्वास संपादन केला आहे. त्यामुळे या कारखान्याबाबत जिल्हा बँकेने सावध पवित्रा घेणे अपेक्षित होते. मात्र या बँकेत जे स्वत:च्या संस्था धड चालवू शकले नाही त्यांच्या हातात सूत्रे असल्याने यातील काही मंडळींना लगाम बसावा म्हणून राज्य शासनाला या संस्थेबाबत जिल्हा बॅकेने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती द्यावी लागली. याचे श्रेय भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. सुरेश उपाख्य राजुमामा भोळे यांना द्यावे लागेल. साखर कारखाना क्षेत्रात जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांना घेराव घातला गेला. स्थानिकांचा उद्रेक याप्रश्‍नी मोठा आहे. सहकाराचे खासगीकरण रोखण्यात तूर्तास आ. भोळे यांना यश आले आहे. विधानसभेत संतप्त भावना व्यक्त केल्याचा आ. भोळे यांचा व्हिडीओ प्रसार माध्यमांवर आल्यानंतर त्यांच्या भूमिकेचे अनेकांनी कौतुक केले. कारखान्याला पूर्वीचे दिवस येण्यासाठी जिल्हा बॅकेने पुढे येणे आवश्यक आहे. यात राजकीय भूमिका नसावी. मात्र तशी परिस्थिती दिसत नाही. याचे परिणाम या मंडळींना भविष्यात भोगावे लागतीलच. जिल्हा बँक ही नफ्यात येणे आवश्यक आहे मात्र ती व्यापारी पेढी नाही शेतकर्‍यांची बँक आहेे, याचे भान या मंडळींनी ठेवणे आवश्यक आहे. बँकेचे अध्यक्ष या नात्याने गुलाबराव देवकर यांनी हे लक्षात घ्यावे व ‘सहकार विकणे आहे’ अशी भावना न ठेवता ‘सहकार टीकविणे आहे’ असा विचार करावा. कारखाना परिसरात काम करणार्‍यांना, ऊस उत्पादकांना विचार घेणे तेवढेच गरजेचे आहे.