देशात शोककळा, तरीही राहुल गांधींची मौजमजा ; भाजपची टीका

नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी परदेश दौऱ्यावर गेल्याचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. राहुल गांधींच्या व्हिएतनाम दौऱ्यावरून भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर संपूर्ण देश शोकसागरात बुडाला असताना राहुल गांधी ‘नवीन वर्ष साजरे करण्यासाठी’ व्हिएतनामला गेले असल्याचे पक्षाने म्हटले आहे. भाजपने राहुल गांधींच्या व्हिएतनाम दौऱ्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

‘‘डॉ. मनमोहनसिंग यांच्या निधनानंतर सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. अशावेळी गांधी हे विदेशात मौजमजा करण्यासाठी जात आहेत. यावरून काँग्रेसला मनमोहनसिंग यांची काहीही पर्वा नव्हती, हे स्पष्ट होते,’’ असे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले.

शहजाद पूनावाला यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल

शहजाद पूनावाला म्हणाले, ‘काँग्रेसला डॉ.मनमोहन सिंग यांची पर्वा नाही. त्यांच्या हयातीत त्यांनी त्यांचा अपमान केला. ते अजूनही करत आहेत. काल त्यांची अस्थिकलश घेण्यासाठी कोणीही गेले नाही. काँग्रेसनेही डॉ.मनमोहन सिंग यांना भारतरत्न देण्यास नकार दिला. हा त्यांचा खरा चेहरा आहे.

राहुल गांधीं ‘पर्यटनाचे नेते’

भाजप नेते शहजाद पूनावाला यांनी राहुल गांधींवर निशाणा साधत त्यांना ‘पर्यटन नेते’ असे संबोधले. ते म्हणाले की, राहुल गांधींनी विरोधी पक्षनेता चा अर्थ बदलून ‘पक्ष नेता’ आणि ‘पर्यटन नेता’ असा केला आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाने देश शोकाकुल असताना राहुल गांधी ‘पर्यटना साठी रवाना झाले आहेत, असे मीडियाच्या वृत्तात म्हटले आहे. राहुल गांधींचा पक्ष आणि ‘परदेशी पर्यटन’ काही नवीन नाही. मुंबईत २६/११ चा हल्ला झाला तेव्हाही राहुल गांधी रात्रभर पार्टी करत होते. डॉ.मनमोहन सिंग यांच्या मृत्यूची त्यांना चिंता नाही. त्यांना फक्त माजी पंतप्रधानांच्या निधनावर राजकारण करायचे आहे. असे शहजाद पूनावाला यांनी म्हटले आहे.