सोन्याच्या चकाकीत देश मजबूत! मार्चपर्यंत आरबीआय खरेदी करणार तब्बल ५० टन सोने

#image_title

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँक मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करीत आहे. रुपयाची घसरण थांबवण्यासाठी सोन्याची खरेदी वाढवण्याचे धोरण आरबीआयने अवलंबले आहे. मार्चच्या अखेरीस आरबीआयने एकूण ५० टन सोने खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. परकीय चलनाचा साठा वाढवणे तसेच चलन किमती बदलण्याचा धोका कमी करणे हा उद्देश आहे. याशिवाय अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची अस्थिरताही कमी करावी लागेल.

ऑक्टोबर महिन्यापासून रिझर्व्ह बँकेने सोन्याच्या खरेदीत वाढ केली आहे. भारताच्या गंगाजळीचा महत्त्वाचा भाग म्हणून सोन्याच्या साठ्याकडे बघितले जात आहे. परकीय चलनाच्या साठ्याचा भाग म्हणून सोन्याच्या साठ्याने सप्टेंबर अखेरीस विक्रमी उच्चांक गाठला होता. त्यामुळे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण रोखणे खूप सोपे झाले आहे. रिझर्व्ह बँकेने एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान ३२.६३ टन सोन्याची खरेदी केली आहे. अशाप्रकारे मार्चमध्ये भारताचा सोन्याचा साठा ५२.६७ अब्ज डॉलर्सवरून ६५.७४ अब्ज डॉलर्स झाला आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही वाढ सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना सोन्याची खरेदी करणे परवडत नाही. आता मोठमोठ्या बँका, संस्था, सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करीत आहेत. कारण, सोन्यातील गुंतवणूक मोठ्या फायद्याची समजली जाते. या गुंतवणुकीतून मोठा परतावा मिळत आहे.